Ajit Pawar aggressive stance on extortion case in Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सध्या राज्यभरात चर्चा आहे. देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील खंडणीसह विविध प्रकारचे गुन्हे समोर आले आहेत. अशात उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत.

अजित पवार यांनी आज सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडणी मागणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रिवॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यार असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार

यावेळी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, “बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे. त्याचबरोबर विकास कामे करत असताना कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. जर असले प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे. मी इथले अधिकारीही पाहणार आहे, इथे काही अधिकारी बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्यामध्येही मी लक्ष घालणार आहे. असे करत असताना मी कोणताही भेदभाव करणार नाही.”

…तर रिवॉल्व्हर परवाने रद्द करणार

गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधील रिवॉल्व्हरने हवेत गोळीबार करणारे आणि कंबरेला रिवॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, “आपण पाहतो टीव्हीवर कधी कधी दाखवले जाते की, कोणी रिवॉल्व्हरने हवेत गोळीबार करते, कोणी कंबरेला रिवॉल्व्हर लावून फिरते. मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, जो कोणी असले प्रकार करेल, त्याचा रिवॉल्व्हर परवाना रद्द करावा. रिवॉल्व्हर हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे तुम्ही जे रील वगैरे बनवाता ते मी खपवून घेणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांकडे बीडचे पालकमंत्रीपद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी होत होती. अखेर महायुती सरकारने ही मागणी मान्य करत अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवले आहे.