Ajit Pawar Bullet Ride : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. ठिकठिकाणी जाऊन ते तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांच्या पोषाखाने लक्ष वेधलेलं असताना त्यांनी आता बुलेटवरून सवाली केली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना दुचाकी चालवायला फार आवडते, असंही ते यावेळी म्हणाले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज या यात्रेचा तिसरा दिवस असून ते सिन्नरमध्ये आहेत. सिन्नरमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी या तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांनी बुलेट सवारीचा आनंद दिला.
जनसन्मान यात्रेतून अजित पवारांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न?
राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदललेली प्रतिमा संपूर्ण राज्यात नेण्याचे नियोजन केले आहे. राज्यात दौरा करताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनेक घटकांशी संवाद साधतात. त्यांचे प्रश्न समजून घेतात. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींना ते अगदी नावासह ओळखतात. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पुतणे अजित पवार हे देखील काकांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. दादांच्या कडक स्वभावातही बदल झाल्याचे पदाधिकाऱ्यांना जाणवत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने त्यांची प्रतिमा उजळविण्यासाठी कंबर कसली आहे.
बुलेट स्वारीबद्दल काय म्हणाले अजित पवार?
याबाबत ते म्हणाले, “मी कॉलेज जीवनात आणि शेती करत असताना मोटरबाईक वापरायचो. त्यामुळे मोटरबाईकवर फिरायला मला आवडतं. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने आता अडचणी येतात. पण आता बसलोय. तारुण्यात खूप फिरलो. बऱ्याच जणींना घेऊन फिरलो आहे.”
“खूप दिवसांनी दुचाकीवर बसल्याने खूप चांगली भावना आहे, असंही ते पुढे म्हणाले. तसंच आता बहिणी आणि मुलींबरोबर चाललो आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं. या बाईकरॅलीत अजित पवारांना हटके स्वॅग पाहायला मिळाला. गुलाबी जॅकेट, डोळ्यांवर गॉगल अन् असंख्य कार्यकर्त्यांच्या गर्दीत त्यांनी बुलेच स्वारी केली.
हेही वाचा >> Ajit Pawar : गुलाबी जॅकेटनंतर आता पैठणीच्या जॅकेटची चर्चा, अजित पवार म्हणाले, “पोराच्या लग्नाची वेळ आली अन् बापाने…”
माता-भगिनींच्या हाती सत्तेची चावी
“आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे. राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय-माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरुपी सुरू ठेवल्या जातील. महाराष्ट्राची प्रगत राज्य म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरीतील जनसन्मान यात्रेत केले.
गुलाबी रंगाला महत्त्व
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाला महत्त्व प्राप्त झालं आहे. यात्रेत शासकीय वाहनांसह अन्य २०० हून अधिक वाहनांचा ताफा आहे. मात्र या ताफ्यात गुलाबी रंगाची वाहने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. याशिवाय काही छोटी वाहनेही गुलाबी असून या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. ही वाहने सभास्थळी, सार्वजनिक ठिकाणी फिरविण्यात येणार असून या वाहनांमध्ये एलईडी पडद्याचीही सुविधा आहे. त्याव्दारे योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून अधिवेशनात जाहीर केलेल्या योजनांची जास्तीजास्त प्रसिध्दी होईल, यासाठी प्रयत्न होत आहे.