अलिबाग– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वजाती, धर्म, पंथ प्रांत आणि भाषा यांना घेऊनच पुढे चालत राहील, जातीय सलोखा राण्यातच तुमचे माझे आणि जनतेचे भले आहे. प्रत्येक माणसाला सुरक्षीत वाटले पाहीजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील यावत येथील तणावच्या पार्श्वभूमीवर ते रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे बोलत होते.

माणगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजीव साबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे मंचावर उपस्थित होते. राजकीय जिवनात चढ उतार येतात. यशवंतराव चव्हाणांनी नवमहाराष्ट्राचा पाया रचला, राजकारणाला सुसंस्कृत चेहरा त्यांनी दिला. ज्याची आज गरज आहे. शेवटी विकास झाला पाहीजे, नुसती भाषणे होऊन चालणार नाही. कृती दिसली पाहीजे, ती कृती करण्याचे काम महायुती सरकारच्या माझ्यामातून सुरु आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जो निधी लागेल तो देण्याचे काम केले जाईल.

इंदापूर आणि माणगाव बायपास ही कामे पुर्ण होई पर्यंत पाच पर्यायी रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी आम्ही जवळपास बावीस कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तो निधी मी दिला जाईल, रेवस रेड्डीचे काम आम्ही मार्गी लावणार आहोत. पर्यटनाला चालना देत आहोत. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ट्रीपल आयटी सेंटर सुरु करत आहोत. ज्यामुळे कौशल्य वर्धन करून तत्रंज्ञ तयार करण्याचे काम करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र विकसित करणार आहोत असेही ते म्हणाले.

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. आठ वर्ष झाल्या नव्हत्या पण आता त्या होणार आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. चांगल्या पध्दतीचे यश मिळवायचे आहे. जिल्ह्यातील मोठा पक्ष म्हणून निवडून आणायचे आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील, रायगडवर जबाबदारी जास्त आहे. कारण प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यातील आहेत. सर्व जागा निवडून आणण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहीजे असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना दिला.

लाडकी बहिण योजना बंद पडणार नाही, काही जण चुकीच्या बातम्या पसरवतात, पुरावे नसतांना भ्रष्टाचाराचे आरोप करतात. बिन बुडाचे आरोप करून विरोधकांना काय मिळते माहीत नाही. जनता सुज्ञ आहे ते अशा अपप्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.