आघाडीच्या सत्ता काळात शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याची ओरड विरोधक करीत होते. महायुतीच्या सत्ता काळातही शेतक-यांची आत्महत्या होतच आहेत. आमचे शासन शेतक-यांना निदान मदत तरी करीत होते. पण फडणवीस सरकारने त्यांना वा-यावर सोडले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था हाताबाहेर गेली आहे. अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य शासनाच्या कारभारावर सोमवारी येथे बोलताना टिकास्त्र सोडले.
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सोमवारी शाहू सांस्कृतिक सभागृहामध्ये पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार के.पी.पाटील होते. मेळाव्यात माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मानसिंग गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी गरहजर असल्याने त्याची चर्चा होती. समारंभस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छायाचित्रे लहान होती. तर स्थानिक पदाधिका-यांची छायाचित्रे मोठी असल्याने कार्यकर्त्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
पाऊणतासाच्या भाषणामध्ये अजित पवार यांनी राज्यातील आघाडी शासनाच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच गुन्हे घडत आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून गुन्हेगारांवर कोणाचा वचक राहिलेला नाही. कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेली आहे. विरोधक असताना या मंडळींनी बरेच काही करण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण आता सत्तेत आल्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी त्यापासून पळ काढला जात आहे. शेतक-यांना एफआरपीप्रमाणे बिले देणे, एलबीटी, टोल अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
एफआरपीबाबत सत्तारुढ दुटप्पी भूमिका घेत आहे अशी टीका करून पवार म्हणाले, काही साखर कारखान्यांना शासनाने नोटीसा काढल्या असून साखर जप्त करण्याचा इशारा दिला आहे. शासनाने जरूर कारवाई करावी पण सर्वाना एकाच मापाने तोलले पाहिजे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, हरीभाऊ बागडे, रावसाहेब दावने, विनोद तावडे, नितीन गडकरी यांचे कारखाने असताना त्यांना का नोटीसा दिल्या जात नाहीत. असा प्रश्न उपस्थित करून सत्ताधा-यांना दुटप्पी भूमिका घेता येणार नाही, असे मत त्यांनी नोंदविले. सत्तेत असलेल्या भाजपचे एक तर शिवसेनेचे दुसरेच चाललेले असते. सत्ता येऊन १०० दिवस होण्याच्या आतच हे भांडत असल्याने त्यांचे काही खरे दिसत नाही. असा उल्लेख करून पवार यांनी कार्यकर्त्यांना सत्तारुढांचे दोष जनतेसमोर नेऊन मांडण्याचे आवाहन केले.
पक्षाची भूमिका विशद करताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कायमपणे भाजप शिवसेना या जातीयवादी पक्षाच्या विरोधात लढत राहील असे स्पष्ट केले. अनेक वष्रे सत्तेत राहिल्यामुळे आलेली मरगळ झटकून देऊन कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज आहे. पक्ष सदस्य नोंदणी करताना मतदार यादीतील नावे ओढून काढण्याचे प्रकार बंद करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
शेट्टींनी नागपूर गाठावे
ऊसउत्पादक प्रश्नी राजू शेट्टी यांच्या भूमिकेबद्दल पवारांना विचारले असता ते म्हणाले, शेट्टींनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. पूर्वी शेतकरी अडचणीत असताना शरद पवार वेळीच मदत करीत असत. आता ऊस, कापूस सोयाबीन, दूध, उखळ अशा सर्व प्रकारचा शेतकरी अडचणीत असतानाही राज्य शासन कसलीच मदत करीत नाही. अशा स्थितीत शेट्टींनी नागपूरला जाऊन आंदोलन करावे. असा टोला त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticized fadnavis govt
First published on: 03-02-2015 at 04:05 IST