शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडी स्थापन करत सरकार सत्ता मिळवली. मात्र, तीन पक्षांचं सरकार सत्तेत येण्याआधी ८० तासांसाठी दोन पक्षांचं सरकार देखील राज्यात सत्तेवर होतं. सगळ्यात अल्पावधीचं सरकार म्हणून राज्याच्या इतिहासात नोंद झालेल्या या सरकारचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री होते अजित पवार! भल्या सकाळी अजित पवारांनी अचानकपणे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्या शपथविधीचा विषय अजूनही चवीने चघळला जात असताना खुद्द अजित पवार हे मात्र त्याबाबत अजिबात चर्चा करू इच्छित नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी अजित पवारांच्या त्या शपथविधीवर देखील त्यांनी भाष्य केलं. मात्र, शरद पवारांनी केलेल्या त्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेण्यासाठी अजित पवारांना शरद पवारांनीच पाठवलं होतं का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्याला त्यांच्या शैलीतच उत्तर दिलं. “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही”, असं पवार म्हणाले होते.

https://fb.watch/adaOshD2ui/

फडणवीस- अजित पवारांचं पहाटेचं सरकार तुमच्या आशीर्वादानेच स्थापन झालेलं का?; शरद पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“..तो माझा अधिकार, संपला विषय”

दरम्यान, याविषयी जेव्हा पत्रकारांनी पुण्यात अजित पवारांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. “जेव्हा सर्वोच्च नेते बोलतात तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने अजून त्यावर वक्तव्य करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही ऐकलेलं आहे. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय, जेव्हा मला वाटेल, तेव्हा मी त्यावर बोलीन. तो माझा अधिकार आहे.. संपला विषय”, असं अजित पवार म्हणाले.