Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी राज्यभर जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या महायुतीबाबत सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे जागावाटप. यासंदर्भात नेमका फॉर्म्युला कधी ठरणार व जाहीर कधी होणार? याविषयी तर्क-वितर्क सुरू असताना अजित पवारांनी त्याबाबत भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाकडे १०३ आमदार आहेत. त्याचबरोबर शिंदे गट व अजित पवार गट यांच्याकडे जवळपास समसमान आमदारांचं संख्याबळ आहे. पण एकीकडे राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजपा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे भाजपापेक्षा निम्म्याहून कमी आमदार आहेत. जर तिन्ही पक्षांमध्ये समसमान जागावाटप करायचं झाल्यास भाजपाला विद्यमान आमदारांच्या जागा मित्रपक्षांना द्याव्या लागतील. त्याउलट इतर दोन्ही पक्ष फुटून बाहेर पडले नसते, तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये समसमान जागा मिळण्याची शक्यता जास्त होती. या पार्श्वभूमीवर जागावाटपात भारतीय जनता पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कुणालाही स्वबळावर सत्ता मिळणार नाही – अजित पवार

दरम्यान, अजित पवारांनी आज नाशिक दौऱ्यात माध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात कुणालाच स्वबळावर सत्ता मिळणं अशक्य असल्याचं ते म्हणाले आहेत. “आज महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय स्थिती पाहाता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ महाराष्ट्रात दिसत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपापल्या परीने प्रयत्न करतात”, असं ते म्हणाले.

‘असा’ असेल जागावाटपाचा फॉर्म्युला!

महायुतीमधील जागावाटप हे तिन्ही पक्षांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुकांप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय आहे. यावर निश्चित असा निर्णय झालेला नसला, तरी नेमकं कोणत्या दिशेनं ही प्रक्रिया जाईल, याबाबत अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

Ajit Pawar on Opposition Allegations: अजित पवार खरंच लपून दिल्लीला गेले होते? स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी तेव्हा विरोधी पक्षनेता…”!

“जागावाटपावर प्राथमिक चर्चा झालेली आहे. विद्यमान जागा ज्यांच्याकडे आहेत, त्या जागा त्यांच्याकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण काही विद्यमान जागादेखील एकमेकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. तिघांमध्ये एकमत होऊन एखादी जागा समजा ‘अ’ पक्षानं सोडली आणि ‘ब’ पक्षानं स्वीकारली, तर त्याबदल्यात ‘ब’ पक्षानंदेखील एक जागा ‘अ’ पक्षासाठी सोडली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“मित्रपक्षाकडे अधिक सक्षम उमेदवार असेल तर…”

“मध्यंतरी तटकरेंनी एक विधान केल्यानंतर विशेषत: दिंडोरीसाठीच्या वेगवेगळ्या बातम्या चर्चेत आल्या. पण सध्या विद्यमान जागा त्या त्या पक्षाकडे राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. जर एखाद्या पक्षाकडे असणाऱ्या उमेदवारापेक्षा मित्रपक्षाकडे असणारा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता जास्त असेल, तर ते करण्याची मानसिकता सगळ्यांनी दाखवली आहे. पण त्याला अजून अंतिम स्वरूप यायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.