सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी सकाळी अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्याची चांगलीच धावपळ उडाली. या वेळी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहातील दुरवस्थेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच कोणतीही कामे चांगल्या दर्जाची करण्याची तंबी दिली. अजित पवार यांच्या दौऱ्याची आणि त्यांनी घेतलेल्या झाडाझडतीची दिवसभर चर्चा सुरू होती.

आज शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी अचानक सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौरा नियोजित नसल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह,जिल्हाधिकारी, तसेच पोलिसांची चांगलीच धावपळ या वेळी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे सुरक्षारक्षक सोडल्यास, शासकीय लव्याजमाविना आज सकाळी सातारा शहरातील नवीन विश्रामगृहावर दाखल झाले. या दौऱ्याबाबत शासकीय अधिकारीच नव्हे, तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्तेही अनभिज्ञ होते.

अजित पवार साताऱ्यातील विश्रामगृहावर दाखल झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही वेळ ते विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते.

या वेळी त्यांचे लक्ष विश्रामगृहाच्या व्हरांड्यातील तुटलेल्या फरश्यांकडे गेल्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची निकृष्ट कामाबद्दल चांगलीच झाडाझडती घेतली. शासनाचे या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याबाबत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. मागील वर्षीच या विश्रामगृहाचे काम पूर्णत्वास गेले आहे आणि लगेचच वर्षभरात या फरशा कशा उखडल्या अशी विचारणा करत त्यांनी येथील निकृष्ट कामाबाबत संताप व्यक्त केला. तसेच फुटलेल्या फरशा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या.

यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी काही वेळ चर्चा केली. येथील नवीन शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबल्यानंतर ते कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना येथे नियोजित बैठकीसाठी मार्गस्थ झाले. दरम्यान, अजित पवारांच्या या अचानक दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह त्याच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र आज सातारा शहरात पाहायला मिळाले. या दौऱ्याबाबत शासकीय अधिकारीच नव्हे, तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्तेही अनभिज्ञ होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या दौऱ्याची आणि त्यांनी घेतलेल्या झाडाझडतीची दिवसभर चर्चा सुरू होती.