गेल्या दोन दिवसांपासून राज्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात फेकण्यात आलेला दगड ही बाब चांगलीच चर्चेत आहे. खुद्द गोपीचंद पडळकर यांनी यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांवर आरोप केले. तसेच, “गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही”, असं थेट आव्हानच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडतानाच गोपीचंद पडळकरांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. “कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?” असं अजित पवार म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दगड राष्ट्रवादीनंच मारला कशावरून?

अजित पवार यांनी पुण्यात बोलत असताना या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता त्याला उत्तर दिलं. “काय आहे त्या कार्यकर्त्याचं नाव? मीही फोटो बघितला. गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनीच मारला कशावरून? ते आमचे विरोधकच आहे. ते दुसऱ्या कुणाचं नाव घेणार? ते भाजपाचं नाव तर घेऊ शतकत नाहीत. कुणी स्वत:च कट रचून आपल्या गाडीवर दगड मारून घेतला असेल तर काय सांगता येतं. मागे सोलापूरच्या घाटात एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर स्फोट वगैरे झाला. त्यातून राजकारण झालं. काहीजण सहानुभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न करत असतात”, असं अजित पवार म्हणाले.

विचारांची लढाई विचारानेच

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी विचारांची लढाई विचारानेच करायला हवी, अशी भूमिका मांडली. “मी नाशिकमध्ये काल सांगितलं. व्यक्ती कुणीही असू द्या, आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. विचारांची लढाई विचारानेच करावी”, असं ते म्हणाले.

“गोपीचंदजींनी फेकलेली टोपी तुमच्याच डोक्यावर येऊन कशी बसली?” चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूरमध्ये घोंगडी बैठकीतून परत येताना गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगड टाकला. यामध्ये पडळकरांच्या गाडीच्या पुढच्या काचेचं नुकसान झालं. मात्र, यामध्ये त्यांना इजा झालेली नाही. यानंतर पत्रकारांशी बोलताना पडळकरांनी शरद पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला.