मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नास्तिक असल्याची टीका केल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. यावरून राजकारण तापलेलं असतानाच शरद पवारांनी पुण्यात दौऱ्यावर असताना दगडूशेठ हलवाई मंदिराबाहेरूनच दर्शन घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. शरद पवार मंदिरात का गेले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यांनी मांसाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. मात्र, या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यात नेमकं झालं काय?

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाड्याची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले. यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

दरम्यान, या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवार मंदिरात नाही गेले तर ते नास्तिक आहेत? अरे काय चाललंय? हे तुम्ही दाखवायचं बंद करा. म्हणजे बोलणारेही बंद होतील”, असं अजित पवार माध्यमांना उद्देशून म्हणाले.

“तुम्ही हे असलं बोलणाऱ्यांच्यावर बॅन आणा. अजित पवार जरी बोलला, तरी त्याच्यावरही बॅन आणा. (अमोल) मिटकरी तर बाजूलाच राहिला. म्हणजे मिटकरी आलाच ना त्यात? की नाही आला? नॉन व्हेज खाणारे रस्त्याने जात असतील आणि कुणी म्हटलं की आपण दर्शनाला जाऊ. काही मनात ठेवतात, कुणाला सांगत नाहीत. पण काहीजण बोलून दाखवतात की मी आज इथे जाण्यासाठी ज्या गोष्टी माझ्याकडून घडायला हव्यात त्या मी केल्या नाहीत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मंदिरात गेलं तरच दर्शन असं काही नाही”

“मी बाहेरून नमस्कार करून पुढे जायला हवं, आत जायला नको. मदिरात जाऊन तिथेच माथा टेकला तरच खरं दर्शन असं नाही. कधीकधी आपण पंढरपूरला पायरीचं दर्शन घेतो”, असं देखील अजित पवार म्हणाले.