Ajit Pawar On wife ncp mp sunetra pawar attending rss program : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजर राहिल्याची बाब समोर आली आहे. भाजपा खासदार कंगना रणौत यांच्या घरी आयोजित ‘राष्ट्र सेविका समिती’च्या महिला शाखेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा फोटो समोर आल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी हा दुटप्पीपणा अल्याचे म्हटले आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं झालं काय?
भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये एका फोटोत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या देखील पाहायला मिळत आहेत.
“आज माझ्या घरी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचे आयोजन केले होते. आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मुल्य, हिंदु संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवू. आम्हा सर्वांचा संकल्प आहे की मानव सेवा आणि राष्ट्राचे निर्माण आणि सनातन संस्कृतीचे संरक्षण यासाठी सतत कार्य करत राहू. माहिलांची जागरूकता आणि सहभागच देशाला बलवान बनवतो,” असे कंगना रणौत त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।
महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान वर्धा येथील पत्रकार परिषदेत अजित पवारांना या कार्यक्रमाबद्दल विचारले असता अजित पवारांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी विचारतो. मला माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनीट-मिनीट मला माहिती नसतं. मी आता विचारतो की, का गं कुठं गेली होती?” असं खोचक उत्तर अजित पवार यांनी दिले.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मात्र यावरून टीका केली आहे. अजित पवारांच्या पक्षाची ही दुटप्पी भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.
“जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. सत्तेत ते गेलेत, त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊद्या… म्हणजे हे आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एकाबाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एकाबाजूला चव्हाण साहेबांचे, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय,” असे रोहित पवार म्हणाले.