Ajit Pawar on Nilesh Chavan: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना धमकविल्याप्रकरणी कर्वेनगर येथील नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना पिस्तूल दाखवले होते. आज (२३ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असतान त्यांनीही निलेश चव्हाणने दिलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून निलेश चव्हाणला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.
अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांना याची माहिती दिली. ते म्हणाले, या प्रकरणात निलेश चव्हाण नावाची व्यक्ती पुढे आली आहे. वैष्णवीचे बाळ ज्या पद्धतीने हाताळले ते रेकॉर्डवर आलेले आहे. त्या व्यक्तीविरोधातही तक्रार दाखल झाली असून त्याचाही शोध सुरू आहे. आज जर तो सापडला नाही तर पोलीस आयुक्त पुढील कारवाई करतील.”
वैष्णवीच्या प्रकरणात निलेश चव्हाणचे डोकं बऱ्यापैकी चाललेले दिसत आहे. हगवणे आणि चव्हाण मित्रपरिवार दिसत आहे. काही गोष्टी आज जाहीर बोलू शकत नाही. पण चव्हाणनेही त्याच्या पत्नीला घटस्फोट दिलेला आहे. वैष्णवीची जाऊ मयुरी जगतापनेही माध्यमांना छळाबाबतची माहिती दिली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईने तपास करत आहे आणि हा खटला कसा ताकदीने उभा राहिल, याचा प्रयत्न करत आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. कस्पटे कुटुंबीय चव्हाणच्या कर्वेनगर येथील घरी गेले होते. मात्र, त्याने त्यांच्याशी वाद घातला. त्याच्याकडील पिस्तूल दाखवले, असा आरोप वैष्णवी हगवणे यांचे काका मोहन कस्पटे यांनी केला. तसेच याप्रकरणी त्यांनीच पोलिसांत फिर्याद दिली.
निलेश चव्हाणचे कारनामे उघड
निलेश चव्हाणनेही त्याच्या पत्नीचा छळ केल्याचे आता समोर आले आहे. निलेश चव्हाणच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, निलेश चव्हाणवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. हिंजवली पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल आहे. २०२२ साली त्याच्या पत्नीने कलम ३७६, ३७७ आणि इतर या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.