Ajit Pawar on Parth Pawar Pune Land Purchase Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १,८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर अवघ्या काही तासांनी यावरील शुल्क माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे सरकारी नियमांना केराची टोपली दाखवत सदर जमिनीचा व्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुरुवातीला अजित पवारांनी बोलणं टाळलं होतं. मात्र, शुक्रवारी व आज (८ नोव्हेंबर) अजित पवारांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. मुलाने इतका मोठा व्यवहार केला तेव्हा वडिलांना (अजित पवार) त्याची कल्पना दिली नाही का? हा व्यवहार होत असताना अजित पवारांची भूमिका काय होती? ते देखील यात सहभागी आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर अजित पवारांनी आज सविस्तर प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणात एकही रुपया गुंतवलेला नाही : अजित पवार
३०० कोटी रुपयांचा व्यवहार करताना पार्थ पवार यांनी वडील म्हणून तुम्हाला विचारलं नाही का? तुम्हाला या व्यवहाराची कल्पना दिली नाही का? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “अरे मुळात पैसेच गुंतवलेले नाहीत. एक रुपया देखील गुंतवलेला नाही. मी ते सगळं बघितलं, व्यवहार पाहिला, अरे ३०० कोटी रुपये कशाला म्हणतात? एवढी मोठी रक्कम? मला एक गोष्ट कळत नाही की समोरच्या पार्टीने देखील एक रुपया न घेता कसा काय हा व्यावहार केला. हे सगळं गौडबंगाल आहे. आता त्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. आम्ही चौकशी करत आहोत.”
अजित पवार म्हणाले, “या प्रकरणात कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला, खरेदी करणारा की विकणारा ते तपासत आहोत. चौकशी केल्याशिवाय आपल्याला सत्य कळणार नाही. हे कोणी केलं? यात कोण अधिकारी होते? चौकशीचा अहवाला आला की मी अशीच पत्रकार परिषद घेऊन तुम्हा सर्वाना माहिती देईन.”
