Ajit Pawar Raction on Vaishnavi Hagawane Suicide Case : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मी केवळ त्या लग्नाला गेलो होतो. त्या प्रकरणाशी माझा किंवा माझ्या पक्षाचा काय संबंध? तरी प्रसारमाध्यमं उगीच माझ्या पक्षाचा उल्लेख करून बातम्या दाखवत आहेत. माझ्या पक्षातील सभासदांना मी गुन्हे करायला सांगत नाही.”
अजित पवार म्हणाले, “मी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अद्याप प्रसारमाध्यमांसमोर बोललो नव्हतो. उद्या मी कोल्हापूरला आणि परवा पुण्याला जाणार आहे. तिथे मी यावर सविस्तर बोलेन. तत्पूर्वी याबाबत एवढंच सांगेन की याप्रकरणी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या गुन्ह्यात शशांक राजेंद्र हगवणे (वैष्णवीचा पती) व आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड लागलं : अजित पवार
उपमुख्यमंत्री म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असं लचांड लागतं. मी सर्वांना बजावून सांगतो, उद्या मी कोणाच्या लग्नाला आलो नाही तर मला माफ करायचं, नाहीतर असं लचांड लागतं.
चार जण अटकेत, दोन फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना; अजित पवारांची माहिती
अजित पवार म्हणाले, “शशांकसह लता राजेंद्र हगवणे व करिष्मा राजेंद्र हगवणे या तिघांना याप्रकरणी अटक केली आहे. तर राजेंद्र तुकाराम हगवणे व सुशील हगवणे हे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. आणखी काही पथके तयार केली जातील. तसेच मयत महिलेचं नऊ महिन्यांचं बाळ (जनक) हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आनंदराव कसपटे यांच्या ताब्यात दिलं आहे. काळजी व संगोपणाच्या उद्देशाने बाळ त्याच्या आजोबांकडे सुखरूप पोहोचवलं आहे”.