Ajit Pawar on Sadabhau Khot Controversial Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सारीपाट आता रंगू लागला आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंचं जागावाटप उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालं आहे. कोण कुठून कुणाविरोधात निवडणूक लढवत आहे तेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचार व त्यानिमित्ताने होणारे आरोप-प्रत्यारोप चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रसंगी या आरोपांना चिखलफेकीचंही रुप येत असल्याचं दिसत आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेलं विधान त्यामुळेच चर्चेत आलं असून त्यावरून अजित पवारांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेलं विधान आणि त्यानंतर व्यक्त केलेली दिलगिरी यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी होत आहे. शरद पवार यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारणा केली असता शरद पवारांबाबत अशी विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, अशी स्पष्ट बूमिका त्यांनी मांडली. बुधवारी संध्याकाळी याबाबत त्यांनी एक्सवर पोस्टदेखील केली होती. आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी त्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

“महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, विरोधकांबद्दल बोलताना पातळी कशी सोडायची नसते, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात हे आपल्याला शिकवलं. आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण ते मांडण्याची एक पद्धत असते. तीच पद्धत पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा अनेकांनी चालू ठेवली. पण काल सदाभाऊ खोत यांनी जे विधान केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. मी त्याचा निषेध करण्यासाठी ट्वीटही केलं”, असं अजित पवार म्हणाले.

“मी फक्त तेवढ्यावरच थांबलो नाही. मी सदाभाऊ खोतांना फोन केला. मी त्यांना म्हटलं की तुमचं हे विधान आम्हाला कुणालाही अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही हे बंद करा. अशा प्रकारे कुणाबद्दल वैयक्तिक बोलणं ही आपली पद्धत नाही. आम्ही त्याबद्दलचा निषेध व्यक्त केला आहे. शरद पवारांच्या बाबतीत तर हे असं घडताच कामा नये”, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

“विनाशकाले विपरीत बुद्धी”

“इथून पुढे महाराष्ट्रात अनेक नेतेमंडळी, राजकीय पक्षांचे वक्ते, राष्ट्रीय नेते येतील. पण कुणीच कुणाच्याबद्दल बोलायला नको. तुम्हाला काय तुमची भूमिका मांडायची ती मांडा. मतमतांतरे असू शकतात. पण ते मांडत असताना त्याला काहीतरी ताळमेळ असायला हवा. हे विधान म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यांनी सांगितलंय की अशा गोष्टी पुढे होणार नाहीत. बघू”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही; अजित पवार यांचा महायुतीच्याच नेत्यांना इशारा

“मी त्यांना पत्रकार परिषद रद्द करण्याबाबत काहीही बोललो नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. तुम्ही असं बोलून नवे प्रश्न निर्माण करू नका. वडीलधाऱ्या लोकांबाबत असं विधान केलेलं महाराष्ट्र सहन करत नाही, आम्ही सहन करत नाही. आम्हाला ते मान्य नाही”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

सांगलीच्या जत परिसरात एका प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीसदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. “देवेंद्र फडणवीस म्हणाले गायीचं सगळं दूध वासरांनाच देणार. मग शरद पवारांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? शरद पवार साहेब, तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने, बँका, सूत गिरण्या लाटल्या. पण त्यांना मानावं लागेल की एवढं करून आता म्हणतात मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा हवाय का?” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.