बीड : सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. मात्र धमक्या देऊन, आमिष दाखवून, फोडाफोडी करून सत्तेवर आलेले सरकार मस्तीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीत. तरुणांना नोकऱ्या नाहीत. एक मुलगा उपमुख्यमंत्र्यांकडे नोकरी मागायला गेला तर त्याच्यावर लाठीमार केला जातो. त्यांचेच आमदार गोळीबार करतात. ही सत्तेची मस्ती उतरविण्याची ताकद महाराष्ट्रातील मतदारांमध्ये असल्याचा इशाराही पवार यांनी शनिवारी दिला.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी पार पडला. प्रमुख मार्गदर्शक अजित पवार यांच्यासह माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, धैर्यशील सोळंके, जयसिंह सोळंके उपस्थित होते. या वेळी अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील लाखो तरुणांना नोकऱ्या देणारा, महाराष्ट्राची समृद्धी वाढवणारा प्रकल्प राज्याबाहेर जातो. हा प्रकल्प आमच्यामुळे नाही तर मागच्या सरकारमुळे गेल्याचे सांगता, असे म्हणत पवारांनी १५ जुलैचे पत्र दाखवत सरकारला खडसावले. खोक्याने जमले म्हणजे सगळे जमत नसते. पुन्हा म्हणता हा प्रकल्प जाऊ द्या, दुसरा आणतो, तो काय तुमच्या घरचा आहे का? असा संतप्त सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला. पीकविम्याचे पैसे दिले जात नाहीत. भर पावसात लोकांना आणि युवकांना आंदोलन करावे लागते. बेरोजगार नोकरी मागायला आला तर त्याच्यावर लाठीहल्ला होतो ही सत्तेची मस्ती आहे, ती उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

सत्तेतील आमदारच पिस्तूल काढून गोळीबार करू लागले तर हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जातोय? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. संविधानाने फोडाफाडीचे आणि खोक्याचे राजकारण करायचे सागितलं नाही. लोकांची कामे करण्याचे काम सरकारचे असते. चांगले कामे हाती घ्या, त्या निर्णयांना आम्हीही पाठिंबा देऊ असेही ते म्हणाले. नुसते भाषणात सांगून आमदार-खासदार निवडून येत नसतात. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. बूथ कमिटय़ा केल्यात का, लोकांपर्यंत जाताय का? आम्ही सात-सात वेळा निवडून येतो. आपल्या पक्षात अनेक नेते अनेक वेळा निवडून येतात. ते सातत्याने जनतेच्या सोबत असतात. जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणायचे असतील, तर जिल्हा बँकेसह सहकारी संस्था मजबूत करा. जनसंपर्क वाढला पाहिजे, लोकांची कामे झाली पाहिजेत, असे म्हणत अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना लोकांत जाण्याचे आदेश दिले.

भाजपने काय मिळवले ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्याने सरकार आले ते मजेशीर आहे. १२० आमदार असलेल्या भाजपाने काय मिळवले? मुख्यमंत्री तर होता आले नाही, उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही. मात्र, विरोधी पक्षनेतेपद हे संवैधानिक असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सरकार बेशिस्तीत होते परंतु शिस्तीत वागायचे अजित पवारांनी शिकवले. शिंदे-फडणवीस सरकार अजित पवारांना घाबरते, असेही मुंडे यांनी सांगितले.