ओबीसींना राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठीच प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणारा कायदा केला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून, राज्य शासनाकडून नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील  प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोहोर उमटवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली होती. मात्र, निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या उद्देशानेच प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचे कायद्यात रुपांतर झाल्याने आता न्यायालयीन कसोटीवर हा कायदा टिकण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.

त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या बाबतीत सूचक वक्तव्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच निवडणुका घ्याव्या लागतील असे म्हटले आहे.

“निवडणुकांमध्ये ओबीसींनासुद्धा प्रतिनिधित्व मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली तर निवडणुका लगेच पण लागू शकतील. पुणे शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे. यासर्वामध्ये आपण निवडणुकांच्या बाबत जागृत राहा. जनतेने चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचा विकास करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पुण्यातील धनकवडी येथे माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधीनगर परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यात पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले असून उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधाच गुणवत्तापूर्ण भर पडेल, असे अजित पवार यांनी म्हटले.