पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी पुणे मेट्रोचं पहिलं तिकीट मोबाईल द्वारे काढलं. यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्याने उद्घाटन झालेल्या प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांनी केलेल्या आणि वादात सापडलेल्या विधानांवरून हा टोला अजित पवारांनी लगावल्याचं बोललं जात आहे.

“पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद द्यायला हवी”

यावेळी अजित पवारांनी आज उद्घाटन झालेल्या पुण्यातील प्रकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे. “पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेनं ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांना इतर प्रकल्पांसाठी मदतीचं आवाहन

दरम्यान, पुणे मेट्रोप्रमाणेच पुण्यातील इतर प्रकल्पांसाठी देखील मदत करण्याची विनंती यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. “पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेड या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi in Pune : “पूर्वी भूमिपूजन तर व्हायचं, पण प्रकल्प…”, पंतप्रधानांचा काँग्रेसला खोचक टोला!

राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला!

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”, असं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी देखील राज्यपालांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावेळी राज्यपालांनी त्यांच्या विवाहाच्या वयाविषयी हे विधान केलं होतं. याचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला होता.

Video: “कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे…”; सावित्रीबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये “राज्यपाल हे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय. त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील”, असं विधान त्यांनी केल्याचं दिसत आहे.