मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात घेतलेल्या सभेमध्ये विविध मुद्द्यांवरून चौफेर टोलेबाजी केली. यामध्ये त्यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याच्या मुद्द्यावर भाष्य करतानाच राज्यातील सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या धोरणांवर टीका करताना “तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी कमी करत आहात”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंच्या या टीकेवरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

“तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी कमी करताय”

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. “काल शिवसेनेतलं कुणी म्हणालं की राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray Pune Speech : “निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा”, राज ठाकरेंचा शरद पवारांवर नाव न घेता टोला!

“त्यांनी हवं ते म्हणावं, आम्हाला…”

दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय. मी काल देखील जळगाव जामवत, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे माझी भूमिका तीच राहिली आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा हाताळण्यात पोलिसांना मदत होणार आहे, त्या गोष्टीला देखील महत्त्व देऊ ना”, असं आवाहन अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर केलं.

Raj Thackeray Pune Speech : “यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय”, राज ठाकरेंची शिवसेनेवर आगपाखड!

“पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…”

औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं अकबरुद्दीन ओवेसी यांनी दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरेंनी निशाणा साधला. “आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो साम्राज्य विस्ताराला आला होता. मग शिवाजी महाराज काय त्याच्या रस्त्यात गेले का?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.