Ajit Pawar on Koregaon Park Land Deal : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटी पार्क उभारण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकरांचा भूखंड कुठलंही शासकीय शुल्क न भरता खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. अशातच बावधन पोलिसांनी पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घटनास्थळाचा पंचनामा केला. नोंदणी झालेली कागदपत्रे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी जप्त केली असून या व्यवहारात सहभागी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले, “मी उद्या मुंबईला जाणार आहे. तिकडे गेल्यावर मी पार्थला सल्ला देणार आहे की कुठलाही खरेदी व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेत जा. वकिलांसह आपल्याकडे या गोष्टींसाठी तज्ज्ञांचं पथक असून त्यांचं शुल्क देऊन सल्ला घेत जा.”
“माझ्या नातेवाईकांना चुकीचं काम करू देऊ नका”, अजित पवारांचा प्रशासनाला सल्ला
अजित पवार म्हणाले, “मी काल प्रशासनाला एक सल्ला काल दिला आहे. त्यांना सांगितलं आहे की इथून पुढे माझ्या जवळचे, लांबचे जे नातेवाईक अशा पद्धतीने गैरव्यवहार करत असतील, काही चुकीचं करत असतील किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांच्याकडून चूक घडत असेल आणि ती चूक तुमच्या लक्षात येत असेल तर ते काम अजिबात करू नका. कोणाच्या दबावाला घाबरू नका.”
“मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मी अशा गोष्टींचं समर्थन करणार नाही आणि मला ते पटत नाही. हे सगळं होत असताना मी पार्थला एक सांगणार आहे. माझे काल उशिरापर्यंत कार्यक्रम चालले, तिथून मी थेट निघालो आणि इकडे पुण्याला आलो. पार्थ सध्या मुंबईत आहे. मी उद्या मुंबईला जाणार आहे. उद्या आमची भेट होईल.”
“तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जा”, अजित पवार पार्थ पवारांना सल्ला देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पार्थ भेटल्यावर मी त्याला सांगणार आहे की हे जे प्रकरण झालं. त्या प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी शिकल्या पाहिजेत. माणूस अनुभवातून नव्या गोष्टी शिकतो. ही त्याची सुरुवात आहे. पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीने काही घडलं तर बघ, काही लोकांवर आपला विश्वास असतो, परंतु, त्यांनी काही सांगितल्या तरी त्यातल्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. त्या तज्ज्ञाला त्याचं शुल्क द्यावं लागलं तरी चालेल. परंतु, काही करताना वकिलाचा सल्ला घे. आपल्याकडे चांगले सल्लागार व वकील आहेत. एक पथक आहे, त्यांचा सल्ला घे आणि पुढे जा.”
