scorecardresearch

“…तर अजित पवार मुख्यमंत्री असते”, अजित पवार उपस्थित असलेल्या मंचावरून भाजपा आमदाराचं विधान

पहाटेच्या शपथविधीवरून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे यांनी टोलेबाजी केली आहे.

ajit pawar

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं होतं. पण अवघ्या काही तासांत हे सरकार कोसळलं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकून सरकार स्थापन केलं होतं. या पहाटेच्या शपथविधीवरून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे यांनी टोलेबाजी केली आहे.

अजित पवारांनी पहाटेच्या ऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, असं विधान पोटे यांनी केलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार एकाच मंचावर उपस्थित असताना प्रवीण पोटे यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.

हेही वाचा- “जे गाढव, नालायक असतात, ते…”, राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांचा हल्लाबोल!

आज अमरावतीत ‘राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन’च्या वतीने राज्यस्तरीय ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा’ पार पडला. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. दरम्यान, भाजपा नेते व आमदार प्रवीण पोटे यांनी भाषण केलं. या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं.

हेही वाचा- राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली; गलिच्छ भाषेचा वापर करत म्हणाले…

प्रवीण पोटे आपल्या भाषणात म्हणाले, “आज आपण या कार्यक्रमातून कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार करत आहोत. पण जेव्हा मी पुरुषांसाठी अशा पुरस्काराची सुरुवात करेल, त्यादिवशी मी अजितदादांचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. तसेच दादा तुमचा थोडा वेळ चुकला. तुम्ही सकाळच्या ऐवजी दुपारी शपथविधी केला असता तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता, हा गंमतीचा भाग आहे. अंगावर घेऊ नका रागावू नका,” असं प्रवीण पोटे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 20:32 IST