बीड : मराठवाड्यातील परिस्थितीबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देणार असून, केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आम्ही सर्वजण पाहणी दरम्यान एकमेकांच्या संपर्कात असल्याचा अजित पवारांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्याला उभे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे अजित पवारांनी ठामपणे सांगितले.
पावसामुळे, तसेच पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, याचबरोबर छोटे पूल वाहून गेले आहेत. शाळांच्या खोल्यांचे पण नुकसान झाले आहे. पंचनाम्याला आजपासून सुरुवात केली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यात कुठे अडचण येऊ नये, असे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. नद्यांच्या काठावर असलेली जमीन खरवडून गेली आहे. काहीच शिल्लक नाही. खरवडून गेलेल्या जमिनीचे पण पंचनामे करण्याचे सांगितले आहे. खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबत खर्च देण्याच्याबद्दल सरकार सकारात्मक राहील. पाझर तलाव फुटल्याने आजूबाजूच्या विहिरी बुजल्या आहेत. यासाठी पण निधी उपलब्ध करून द्यायचा आहे.
शक्तिपीठ, कुंभमेळ्याला देण्यात येणारा पैसा वळवा, अशी मागणी आहे. पण आपण प्रत्येक प्रकल्पासाठी वेगळा पैसा देतो. पैसा कुठला वळवायचा हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. लाडक्या बहिणींच्याबाबत आम्ही काटकसर केली नाही. आम्ही ४५ हजार कोटी रुपये दिले आहेत. श्रावण बाळ इंदिरा गांधी योजनेतदेखील काटकसर केली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.