अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आमदार जगताप यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन स्वीकारलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका चर्चेत आली आहे. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले अजित पवार आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात कारवाई करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमदार जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना, दीपावलीची खरेदी फक्त हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले. याची दखल घेत अजित पवार यांनी पुण्यात बोलताना जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे. पवार दसऱ्याच्या दिवशी नगर जिल्ह्यात होते. त्यावेळी त्यांची नगरमधील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेत जगताप यांच्या भूमिकेविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर पवार यांनी जगताप यांना समज दिली होती. पवार यांच्या सांगण्यानुसार जगताप यांनीही सुधारणा करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, पवार यांच्या इशाऱ्यामुळे जगताप यांनी पक्षाच्या विचारधारेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

संग्राम जगताप नगर शहर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. परंतु, त्यांची यापूर्वीच्या दोन कार्यकाळातील भूमिका व सध्याची तिसऱ्या कार्यकाळातील भूमिका यामध्ये मोठा फरक पडलेला आहे. सध्या त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. या भूमिकेसाठी ते भाजपचे मंत्री नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत राज्यात विविध ठिकाणी दौरा करत, हिंदुत्ववाद्यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चात भाषणे देत आहेत. जगताप यांची भाषणे प्रखर होत आहेत. भाजप आमदारांसमवेत होत असलेले हे दौरे त्यांना भाजपचे वरिष्ठ पातळीवरून पाठबळ मिळत असल्याचे दर्शवतात.

विशेष म्हणजे यापूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपचे नितेश राणे यांनी नगर शहरात येऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना लक्ष्य करत आरोपही केले होते. त्याला जगताप यांनी प्रत्युत्तरही दिले होते. मात्र, आता राणे व जगताप एकत्रित राज्यात विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चासमोर हिंदुत्वाविषयी भूमिका मांडत परस्परांचे समर्थनही करत आहेत. नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेल्या तणावांच्या घटना तसेच राज्यभरातील दौऱ्यानिमित्त संग्राम जगताप यांनी केलेली भाषणे कडव्या हिंदुत्ववादाची असल्याचे दर्शवतात. नगर शहरात घडत असलेल्या तणावांच्या घटनांमध्ये सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेचा शिंदे गट यांच्याकडून कोणतीही वक्तव्ये केली जात नाहीत. जणू या पक्षांनी या घटनांबद्दल मौनच बाळगल्याचे दिसत आहे. आमदार जगताप यांच्या भूमिकेमुळे या दोन्ही पक्षांकडील हिंदुत्वाचा मुद्दा हिरावल्यासारखे झाले आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित एकत्रित शिवसेनेने नगर शहर मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे झालेले निधन व शिवसेनेत पडलेली फूट यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित नेतृत्व करण्याची संधी संग्राम जगताप साधत असल्याचीही चर्चा होत आहे.