अकोले : भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणही भरले, तर मुळा धरणाचा पाणीसाठा २५ टीएमसी झाल्यानंतर धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या मुसळधार वृष्टीनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. भंडारदरा व निळवंडे धरणांमधून सुरू असणारे विसर्ग त्यामुळे कमी करण्यात आले.

मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची विक्रमी स्वरुपात आवक झाली. पूर्वीच भरलेल्या भंडारदरा धरणात २४ तासांत १ हजार १२३ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. हे सर्व पाणी सोडून देण्यात आले. त्यासाठी भंडारदरा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी कृष्णवंती या प्रवरेच्या उपनदीत आणि ओढ्यानाल्यांचे पाणी निळवंडे धरणात जमा होत असल्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली आणि ८ हजार ३२० दशलक्ष घनफूट साठवणक्षमता असणारे निळवंडे धरण गुरूवारी सायंकाळी भरले.

दोन दिवसांच्या तुलनेत पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भंडारदरा विसर्ग २ हजार ३५७ क्युसेकवरून ८२५ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. निळवंडे धरणातील ७ हजार ३६६ क्युसेक प्रवाहही ८५० क्युसेक करण्यात आला.

हरिश्चंद्रगड परिसरातही दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मुळा नदी तीन दिवस दुथडी भरून वाहत होती. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा आज २५ हजार दशलक्ष घनफूट झाला. या धरणातील पाणीपातळी आणि पाणीसाठा नियंत्रणासाठी दुपारी धरणातून नदीपात्रात १ हजार ५०० क्युसेकप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला. आवश्यकता वाटल्यास या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान धरणातील पाणीसाठा २४ हजार ८८५ दलघफू इतका नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळा धरण ३१ ऑगस्टनंतरच पूर्ण क्षमतेने भरेल.

कालचा पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे

भंडारदरा ४७, घाटघर ४५, पांजरे ५४, रतनवाडी ६१, वाकी ३९, निळवंडे १६, आढळा धरण ७, कोतुळ २, अकोले ९.

आज सायंकाळचा धरणातील पाणीसाठा दशलक्ष घनफूट

भंडारदरा १० हजार ९७४ (९९.४१ टक्के), निळवंडे ८ हजार २४३ (९८.९८ टक्के), मुळा २५०१३.