फेब्रुवारीमध्ये डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षय कुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक प्रवीण दवणे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना हरवून ज्येष्ठ काव्य समीक्षक अक्षय कुमार काळे यांची निवड करण्यात आली आहे.

काळे हे साहित्य अकादमीचे सदस्य आहेत. नागपूर विद्यापीठात ते मराठीचे विभागप्रमुख देखील आहेत.
गालीबचे काव्यविश्व: अर्थ आणि भाष्य, अर्वाचिन मराठीचे काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता आकलन आस्वाद आणि चिकित्सा हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच, सूक्तसंदर्भ’, ‘गोविंदाग्रज-समीक्षा’, ‘कविता कुसुमाग्रजांची’ या त्यांच्या पुस्तकांनाही समीक्षक आणि अभ्यासकांची दाद मिळाली आहे.

काळे यांनी ‘स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह’ या विषयामध्ये पीएचडी मिळवलेले आहे.
शनिवारी मतपत्रिका पाठविण्याची शेवटची मुदत होती. मतदारांनी पाठवलेल्या १०७९ मतपत्रिकांद्वारे आज सकाळी संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार हे ठरणार होते.

सुरुवातीपासूनच या निवडीची चर्चा वर्तुळात होती. प्रवीण दवणे यांनी प्रवास करुन मतदारांची मने वळविण्याच प्रयत्न केला परंतु त्यांना केवळ १४९ मते पडली. मदन कुलकर्णी आणि जयप्रकाश घुमटकर यांची कामगिरीदेखील निराशाजनकच राहिली.