पंढरपूर : राज्यात सर्वदूर वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर येथे जोरदार पावासाने हजेरी लावल्याने नीरा आणि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप घेतली नसल्याने ओढे, तलाव, नदी येथील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यात उजनी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
पुणे जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे दौंड येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे उजनी धरणाची पाण्याची पातळीत वाढ मोठ्या प्रमाणत होत आहे. रविवारी सकाळी उजनी धरणाची पाणी वजा १६.९४ टक्के होते तर सायंकाळी सहा वाजता उजनी धरण वजा १४. ३३ टक्के इतके झाले आहे. म्हणजेच दिवसभरात जवळपास अडीच टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे नीरा खोरे व भीमा खोरे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. नीरा नदीपात्रात लोटे येथे २६ हजार ५२५ क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे. तसेच भीमा नदी पात्रात कोल्हापूर बंधाऱ्यामध्ये आधीपासून पाणीसाठा आहे.
सद्यस्थितीला विसर्ग पाहता भीमा नदी पात्रातील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. तरी कोणीही बंधाऱ्यावरून जाण्याचा व नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. भीमा नदी काठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा भीमा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी ज्योती इंगवले यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, रविवारी देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे नाले भरभरून वाहत आहे.