अलिबाग – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने कार ऑन रोल सुविधा सुरू केली असून आज या सेवेचा प्रारंभ झाला. या सेवेला कोकणवासीयांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. केवळ पाच वाहने घेऊन कोकण रेल्वेची पहिली गाडी गोव्याच्या दिशेने रवाना झाली.

कोकण रेल्वे मार्गावर ट्रक ऑन रेल सुविधा आजवर उपलब्ध होती. यंदा मात्र पहिल्यांदाच कार ऑन रेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास कोलाड स्‍थानकात या पहिल्या रो रो गाडीला हिरवा झेंडा दाखवण्‍यात आला. तत्‍पुर्वी या सेवेच्‍या पहिल्‍या प्रवाशांचा शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्‍वेचे वरिष्‍ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी रस्‍त्‍यावर खडडे पडले आहेत. रस्‍त्‍याच्‍या दुरवस्‍थेमुळे गणेशोत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल होतात शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. यातून सुटका व्‍हावी यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडया सोडल्‍या आहेत. याशिवाय ट्रक ऑन रोल प्रमाणे कार ऑन रोल सेवा देखील सुरू केली आहे. रायगडमधील कोलाड रेल्‍वे स्‍थानकातून आज पहिली गाडी सुटली. कोकण रेल्‍वेच्‍या या पहिल्‍याच प्रयत्‍नाला अल्‍प प्रतिसाद मिळाला. अवघ्या पाच गाड्या घेऊन ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान प्रवाशांनी या सेवेचे स्‍वागत केले असून बरेच दिवस आम्‍ही या सेवेची वाट पहात होतो असे असं म्‍हटलं आहे. तर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा सुरू ठेवण्‍यात येईल, रेल्‍वे प्रशासनाकडून सांगण्‍यात आले.

या रेल्वेतून एका वेळी ४० वाहने घेऊन जाता येणार आहे. मात्र पहिल्या दिवशी केवळ पाचच वाहनांचे आरक्षण झाले होते. सुरवातीला किमान १६ गाडयांचे आरक्षण झाले तरच गाडी सोडण्‍यात येईल कोकण रेल्‍वेने जाहीर केले होते. तरी देखील आज पहिली रो रो सेवा पाच गाडयांसह सोडण्‍यात आली.

सध्‍या रस्‍त्‍यावर खड्डे आहेत. त्‍यामुळे प्रवासात खूपच त्रास होतो. म्‍हणून बरेच मार्ग आम्‍ही अजमावले. रस्‍त्‍याच्‍या प्रवासात वेळही जातो. जर ट्रक जातात तर कार का नाही असं मला राहू राहून वाटत होतं. पण आज ते प्रत्‍यक्षात उतरलं आहे. कोकण रेल्‍वेने हा चांगला उपक्रम राबवला आहे. – राजेश पाटील, प्रवासी

कोकण रेल्‍वेने हा नवीन प्रयोग यावर्षी केला आहे. यामध्‍ये कार रो रो सेवेच्‍या माध्‍यमातून वाहून नेण्‍यात येत आहेत. नांदगाव आणि वेरणा इथं या गाडीला थांबा असेल. आज पहिली फेरी होती. आज यामधून पाच कार पाठवण्‍यात आल्‍या आहेत यापुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा सुरू ठेवण्‍यात येईल. – दिनेश बोंडे, उपमुख्‍य वाणिज्‍य प्रबंधक, कोकण रेल्‍वे