अलिबाग -पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी राजा हैराण झालेला असतानाच रायगडच्या माणगावमधील तरूण शेतकऱ्यांनी कमाल केली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच कलींगडाचे बंपर पीक घेतलं आहे. ओसाड माळरानावर वाशीच्या एपीएमसी मार्केटला पहिल्या काढणीतील ८० टन कलींगडे रवाना झाली असून त्यांना किलोमागे बाजारभावाच्या दुप्पट दर मिळाला आहे.
साधारणपणे कलिंगड हे उन्हाळी पिक म्हणून ओळखले जाते जानेवारीपासून कलींगडांचा हंगाम सुरू होतो. मात्र माणगावच्या चांदोरे गावात पाडुरंग खडतर आणि रुपेश खडतर तरुण या शेतकऱ्यांनी नऊ एकर माळरानावर कलिंगडाचं पिक घेतले आहे. चांदोरे गावातील एका शेतकरयाची जागा त्यांनी भाडेतत्वावर घेतली. पावसाळयातच त्यांनी कलींगडाचे पीक घेण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली. गणेशोत्सवाच्या दरम्यान त्यानी सीबा जातीच्या कलिंगडाची लागवड केली. दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर आतापर्यंत ८० टन इतके उत्पन्न मिळाले आहे. हंगामापूर्वीच त्यांचा माल बाजारात गेल्याने त्यांना बाजारभावाच्या दुप्पट म्हणजे साधारण किलोमागे 20 रूपये इतका दर मिळाला आहे. या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
रोजगाराची संधी
या तरूणांनी कलींगड लागवडीच्या कामाला सुरूवात केली त्या काळात कोकणात भातलावणीची कामे आटोपलेली असतात. शेतकरी भातपीक येण्याची वाट पहात असतात. या दिवसात मजुरांच्या हाताला काम नसते. याच दिवसात त्यांनी लागवडीची कामे हातात घेवून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. दररोज १५ ते २० मजुर त्यांच्या शेतावर राबत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.
माळरानावर लागवड
मुळचे माणगाव तालुक्यातील चेरवली गावच्या या तरूणांनी पावसाळ्याच्या दिवसात कलींगड लागवडीसाठी योग्य जागेचा शोध सुरू केला. त्यांना चांदोरे गावाजवळची माळरान जमीन पसंत पडली. जागामालकाशी चर्चा करून याच जागेवर लागवड करण्याचे निश्चीत केले. यावर्षी पाऊस खूपच लांबला. अवकाळी पावसामुळे भातपीकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु या शेतकरयांनी कलींगड लागवडीसाठी जी जागा निवडली ती योग्य ठरली. मोठया प्रमाणात पाऊस होवून देखील पाण्याचा निचरा झाल्याने कलींगडांच्या रोपांना धोका पोहोचला नाही उलट पीक अधिक जोमात आले.
सेंद्रीय खतांचा वापर
या तरूण शेतकरयांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खते आणि औषधांचा वापर यामध्ये केला. अतिपावसात रासायनिक खतांचा वापर केल्यास मुळं कुजून रोपे मरून जाण्याची भीती होती. घरच्या गायी असल्याने गोमुत्र, शेण यांचा वापर करत जीवामृत, बुरशी नाशके तयार करून त्यांचा वापर शेतामध्ये केला. याचा खूपच फायदा झाल्याचे पांडुरंग खडतर यांनी सांगितले.
रूपेश खडतर हा मुंबईत नोकरीसाठी गेला होता. काही वर्षे त्याने मुंबईतील नोकरी केली. परंतु मिळणारया पगारात कुटुंबाचं काही भागत नव्हतं अशावेळी त्याने गावाकडची वाट धरली. त्याचे वडील वडीलोपार्जित शेती व्यवसायातच होते त्यामुळे त्याला शेतीच्या व्यवसायाची चांगली माहिती होती. गावाला आल्यानंतर पांडुरंग खडतर यांच्याबरोबर तोदेखील शेतीच्या व्यवसायात उतरला. खडतर बंधूंनी केलेल्या या वेगळ्या प्रयोगाचं आणि धाडसाचं कौतुक होत आहे.
अलीकडच्या काळात कोकणात शेतीचा व्यवसाय आतबट्टयाचा झाला आहे. परंतु शेतकरयांनी स्वतंत्र शेती करण्याऐवजी सामुहिक शेती केली तर कामाचा ताण खूपच कमी होतो. कामाचा योग्य आणि चांगला उरक होतो. यातून चांगले उत्पन्न घेता येईल. प्रत्येक शेतकरयाने घरी एक जरी गाय पाळली तरी दुधाबरोबरच गोमुत्र आणि शेणखत यातून खते आणि बुरशी नाशके तयार करता येतात, असे पांडुरंग खडतर यांनी सांगितले.
आम्ही माळावर कलींगडाची लागवड गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच सुरू केली. खरंतर पावसाळ्यात लागवड सुरू केली आम्ही धोका पतकरला होता. परंतु सेंद्रीय खते आणि बुरशी नाशकांच्या वापरामुळे हंगामापूर्वीच चांगले उत्पन्न मिळाले. – पांडुरंग खडतर, शेतकरी
