अलिबाग : ताडगाव येथील जादुटोणा प्रकरणातील मांत्रिकाला अखेर गजाआड करण्यात रेवदंडा पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. कल्याण पश्चिम मधील गोविंद नगर येथून या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.
अखलास खान आणि सेमा खान या जोडप्याच्या मुलीचे प्रेमप्रकरण होते. त्यातून तिची सुटका करण्यासाठी वीटेला दोरा बांधून २१ विहीरींमध्ये टाकण्याचा सल्ला एका मांत्रिकाने या जोडप्याला दिला होता. हे जोडपे नातेवाईकांच्या लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चोरडे येथे आले होते. मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वाटेत वीटेला दोरा बांधून ठिकठिकाणच्या विहीरींमध्ये टाकत होते. ताडगाव येथील विहिरीत काहीतरी वस्तू टाकताना तेथील ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना थांबवून हटकले परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. विहीरीत काहीतरी विषारी द्रव्य टाकल्याचा संशय आल्याने ग्रामस्थ भडकले. विहिरीत विष टाकण्याच्या संशयावरून तणाव निर्माण झाला होता.
त्यामुळे ग्रामस्थांनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशी नंतर दोघांनी मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार विटांना ताबिज बांधून विहीरत टाकत असल्याची माहीती या जोडप्याने दिली. त्यानंतर मांत्रिकासह जोडप्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाणे येथे भा.न्या.स. कलम २७९, ३(५),महाराष्ट्र अंधश्रध्दा व जादुटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३(१)(२), प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली सुरू होता.
या प्रकरणात नवी मुंबई नेरुळ येथे राहणाऱ्या अखलास खान वय 47 वर्षे,आणि त्यांची पत्नी सेमा खान वय वर्षे 47 यांना पोलिसांनी अटक केली होती. तर जादुटोणा आणि अघोरी करणाऱ्याचा सल्ला देणाऱ्या मांत्रिक खलीय याचा शोध सुरू होता. त्याला पोलिसांनी त्याला गोंविदनगर, कल्याण-पश्चिम येथून ताब्यात घेतले आणि अटक केली.
भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावात आलेल्या अनोळखी जोडप्यांकडून विहीरीत टाकले जात असल्याची बातमीने आसपासच्या गावात खळबळ उडाली होती. जोडप्याने विहीरीत विष टाकल्याच्या संशयावरून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ताडगावं सह इतर चार विहिरीत या जोडप्याने वीट आणि दोरा टाकल्याची बाब समोर आल्याने घबराटीचे वातावरण होते. अखेर पोलीसांनी हस्तक्षेप करून त्यांची समजूत काढली होती.