अलिबाग– सलग सुटट्यामुळे मुंबई पुणे दृतगती मार्गावर बोरघाटात तसेच अलिबाग वडखळ महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची संख्या वाढल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक अत्यंत धिम्यागतीने सुरू होती.
तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येनी बाहेर पडले. त्यामुळे शुक्रवारी सकाळ पासून वाहनांची संख्या अचानक वाढली होती. मुंबई पुणे दृतगती मार्गावर बोरघाटात अमृतांजन ब्रिज ते खंडाळा दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बोरघाट परीसरात वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. घाटात वाहने बंद पडत असल्याने, वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर पडत होती.
अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने वडखळ ते धरमतर, शहाबाज ते पेझारी आणि तिनविरा ते कार्लेखिंड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. २८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पावणे दोन तासांचा कालावधी लागत होता. बेशिस्त वाहनचालक लेनची शिस्त पाळत नसल्याने या समस्येत अधिकच भर पडत होती. पावसाचा जोर आणि रस्त्याची दुरावस्था यामुळे अलिबागकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा दिवसभर खोळंबा सुरु होता. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला.