अलिबाग- अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालक आणि प्रवाश्यांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो आहे. खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवत आहे.

गेली पाच वर्ष हा रस्ता नेमका कोणाचा यावरून वाद सुरू होता. सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने, या मार्गातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वारस्य काढून घेतले. त्यानंतर हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याने, पाच वर्ष या महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सध्या महामार्गाची पुरती वाताहत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

वडखळ ते धरमतर, शहाबाज ते पेझारी, तिनविरा ते कार्लेखिंड आणि वाडगाव ते अलिबाग दरम्यान सध्या रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. महामार्गाला ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्यांमधून वाट काढत मार्गक्रमण कऱणे कठीण होत आहे. पावसामुळे खड्यात पाण्याचे डबके तयार झाल्याने, वाहन चालकांना खड्यांचा अंदाड बाधणेही अवघड झाले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. २८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाश्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याशिवाय राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गेल्या काही वर्षात विकेण्ड होम डेस्टीनेशन म्हणूनही अलिबाग नावारुपास आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहन संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र रस्ता अजूनही अरुंद आहे. अशातच जेएसडब्लू, आरसीएफ, गेल या औद्योगिक प्रकल्पामुळे तसेच पिएनपी बंदरातून होणाऱ्या कोळसा आणि लोहखनिज वाहतुकीमुळे मालवाहू वाहनांची संख्याही मोठी आहे. याचा एकत्रीच परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर होत होत आहे.महामार्गावरील खडडयात आपटून वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

सुट्टीच्या दिवशी महामार्गावर वाहनांची प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याचे सध्या पहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी महामार्गावरील अवजड वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेश दिले असले तरी खराब रस्त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. वाहतुक कोंडीची समस्या सुटू शकलेली नाही. त्यामुळे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

अलिबाग वडखळ मार्गावरून प्रवास करणे सध्या एक दिव्य ठरत आहे. अर्ध्यातासाच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागत आहेत. रस्त्यावरचे खड्डे तातडीने भरायला हवेत, आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन या मार्गाचे चौपदरीकरण व्हायला हवे. – रवी थोरात, प्रवासी.

या रस्त्यासाठी अनेक वेळा मी आंदोलने केली. पण आश्वासना पलीकडे काहीच झाले नाही. रत्याची परिस्थिती फारच बिकट आहे. इथले लोकप्रतिनिधीं या रस्त्याबाबत कमालीचे उदासिन आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आहे. लोकांनी मतदान करतांना विचार करायला हवा. – दिलीप जोग सामाजिक कार्यकर्ते, खड्डे अँक्टीव्हिस्ट