राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या अलिबाग- पेण रस्त्याची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे, मात्र रस्त्याच्या देखभालीकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांना महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार अलिबाग-पेण, खोपोली हा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून महामार्ग प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे.

मात्र या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे. काल्रेिखड ते तिनविरा आणि शहाबाज ते धरमतर या परिसरातील रस्त्याची धुळधाण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या भरमसाट खड्डय़ांमुळे महामार्गावरून गाडय़ा चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जेमतेम ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा कालवधी लागतो.

मुंबई- गोवा महामार्गाबरोबरच आता अलिबाग-पेण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. शेकाप आमदार जयंत पाटील यांनी, लवकरच या कामाची सुरुवात होणार असून आराखडा तयार झाला असल्याचे पत्रकार परिषद घेऊन यापूर्वीच जाहीर केले आहे. चौपदरीकरणामुळे अलिबागहून पेणला १५ मिनिटांत पोहोचणे शक्य होणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

मात्र चौपदरीकरण सोडाच, सध्या या मार्गावर रस्ता शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. रस्त्याची चाळण झाल्याने खड्डे भरण्यासाठी मातीचा वापर केला जातो. मात्र पावसामुळे मातीचा चिखल होऊन परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. कोकणात प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने आणि जिल्ह्य़ाचे मुख्यालय असल्याने अलिबाग येथे दररोज हजारो पर्यटक आणि नागरिक येत असतात. या खड्डय़ातून आपटत त्यांना प्रवास करावा लागतो. यामुळे गाडय़ांचे नुकसान तर होतेच, पण पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार सुरू झाले आहेत. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी याबाबत एक शब्द बोलायला तयार नाही. कारण जिल्ह्य़ात रस्त्यांची कामे करणारे बहुतांश ठेकेदार हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांचे पुढारी आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींची कोणीही दखल घेतलेली नाही. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बोरुडे काही दिवसांपूर्वी अलिबागला आले होते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रारी आल्या तर संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तक्रारी देऊनही एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे रस्त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेली उदासीनता दिसून येत आहे. अलिबाग- पेण मार्गाचे चौपदरीकरण कराल तेव्हा करा, पण सध्याचा रस्ता किमान वाहने सुरळीत चालतील एवढा दुरुस्त करा. एवढी माफक अपेक्षा अलिबागकरांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibaug pen road condition
First published on: 17-08-2016 at 01:51 IST