अलिबाग – अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे नाग आणि मुंगुस यांच्यातील भांडणाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर धुमाकुळ घालत आहे. ज्यात भर रस्त्यात दोघे एकमेकांवर तुटून पडल्याचे पहायला मिळत आहे.

नाग आणि मुंगुस यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वाचे नाते आहे. कारण मुंगुस हे सापांच्या विरोधात लढण्यासाठी जैविकदृष्ट्या विकसित झाले आहेत. मुंगूसाची चपळता, वेग आणि आक्रमकता यामुळे विषारी सापवर वरचढ ठरत असल्याचे पहायला मिळते,साप आणि मुंगूसाच्या लढाईत त्यामुळे बरेचदा मुंगूस वरचढ ठरत असल्याचे सांगितले जाते. याचाच प्रत्यय नुकताच अलिबाग तालुक्यातील चौल रेवदंडा बाह्यवळण रस्त्यावरील प्रवाशांना आला.

पिवळ्या रंगाचा एक नाग आणि एक मुंगूस एकमेकांना भिडले, दोघे एकमेकांवर तुटून पडले होते. आसपासच्या लोकांंची भिडभाड न ठेवता, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पर्वा न करता दोघेही एकमेकांवर प्रहार करत होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

काही वाहनचालकांनी हॉर्न वाजवून दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते. जिवाच्या आकांताने लढत होते. दोघंमधील भांडण काही जणांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आहेत. सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मुंगूसाच्या शरीरातील काही रसायनामुळे त्यांच्यावर सापांच्या विषाचा परिणाम कमी होतो. त्यामुळे अत्यंत विषारी सापांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यात असते, त्यामुळे मुंगूस विषारी सापांना भिडताना दिसतात.