सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उभारलेले हे अत्याधुनिक डेटा सेंटर एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असलेल्या यंत्रणेच्या तोडीचे आहे. हे डेटा सेंटर पाहताना आपण एका जिल्हा सहकारी बँकेचे डेटा सेंटर पाहत नसून एका राष्ट्रीयीकृत किंवा तेवढय़ाच तोलामोलाच्या डेटा सेंटरमध्ये आहोत, याची प्रचिती येते. राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्राला हे भूषणावह आहे, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन यांनी जिल्हा बँकेच्या डेटा सेंटर उद्घाटनप्रसंगी काढले.
जिल्हा बँकेने आरटीजीएस/एनईएफटी/एटीएम, तसेच एनी ब्रँच बँकिंग यांसारख्या कोअर बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने सीबीएस प्रकल्पाचे कामकाज सुरू केले आहे. बँकेने स्वत:चे डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय जुलै २०१२ मध्ये घेऊन डिसेंबर २०१२ मध्ये या डेटा सेंटरचे कामकाज पूर्ण केले. आयबीएमसारख्या नामवंत कंपनीने डेटा सेंटर उभारणीच्या कामकाजात मदत केली असून आयबीएम या प्रख्यात कंपनीने उभारलेले देशातील हे या प्रकारचे तिसरे डेटा सेंटर आहे.
पारंपरिक डेटा सेंटरपेक्षा करफ (Integrated Server Room) चा अंतर्भाव असलेले व विविध यंत्रणांच्या व हाताळणीच्या खर्चात बचत करणारे असे हे डेटा सेंटर असल्याचे आयबीएम कंपनीच्या वतीने याप्रसंगी सांगण्यात आले. आयबीएम कंपनीने उभारलेली अशा प्रकारची यापूर्वीची दोन डेटा सेंटर्स बंगलोर व हरियाणामध्ये असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी बँकेचे अध्यक्ष कृष्णनाथ तांडेल यांनी व्यापारी बँकांशी आता अधिक सक्षमपणे बँकिंग स्पर्धा करणे आपल्या बँकेला शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बँकेच्या संचालक मंडळाने सीबीएस प्रकल्पाबाबतचे वेळोवेळीचे निर्णय एकमताने घेतले; त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी, पुरवठादार व सल्लागार यांनी या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी पुरेपूर सहकार्य केले, त्याबाबत तांडेल यांनी आपल्या भाषणातून समाधान व्यक्त केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाला कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, दूरसंचार निगमचे जिल्हा प्रबंधक प्रभाकर पाटील, जिल्हा उपनिबंधक कुलकर्णी, तसेच बँकेचे सर्व संचालक, संगणक सल्लागार, विविध पुरवठादार उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष विद्याप्रसाद बांदेकर यांनी समारोपप्रसंगी आभार मानले.