सातारा : समाज माध्यमावरील चित्रफीत (रिल्स) बनविण्यासाठी पुणे – बंगळुरू महामार्गावर सातारा शहरानजीक एका उड्डाणपुलावर सर्व वाहने थांबवत चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात हा प्रकार करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा वाहतूक नियंत्रण विभाग तसेच महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
याप्रकरणी ओम प्रवीण जाधव (तारळे, ता. पाटण, सध्या राहणार जुना आरटीओ चौक सातारा), कुशल सुभाष कदम (जरंडेश्वर नाका, सदर बाजार, सातारा), सोहम महेश शिंदे (शिंगणापूर, ता. माण ), निखिल दामोदर महांगडे ( परखंदी, ता. वाई) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी कारवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओम प्रवीण जाधव (तारळे ता. पाटण) या युवकाने सातारा येथे नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाचे ‘ड्रोन’च्या साहाय्याने चित्रीकरण करण्यासाठी त्याने कुशल सुभाष कदम (सदरबझार, जरंडेश्वर नाका, सातारा) याला वाहने घेऊन बोलावले. त्यानंतर सोहम शिंदे आणि निखिल जाधव व एक अल्पवयीन अशा सर्व साथीदार वाहनांसह महामार्गावर आले.
या वेळी त्यांनी पुणे – बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या मार्गिकेवरील सर्व वाहनांना अडवून ठेवले. तसेच आपल्या सोबतची वाहनेदेखील महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, अशी थांबवत ‘ड्रोन’च्या मदतीने चित्रीकरण केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तसेच वाहतूक कोंडीही झाली. यानंतर त्यांनी ही चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित केली.
या सर्व प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी केली. या प्रकरणी इतरांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.