विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदारसंघात टपालाद्वारे आलेले सुमारे ७०० ते ८०० मतदान बोगस स्वरुपाचे आहे. पोस्टल मतपत्रिकांवर स्थानिक पोस्ट कार्यालयाचा शिक्का असल्याने ते बोगस असल्याची खात्री वाटते. हा प्रकार जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून घडला असून या आरोपाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार संजय घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
या संदर्भात घाटगे म्हणाले,की मतदानासाठी पोस्टल पत्रिका सर्व मतदारसंघात येत असतात. तशा त्या कागल मतदारसंघातही आलेल्या आहेत. अशा मतपत्रिकांमध्ये बोगस प्रकार होतो याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे यंदा या पोस्टल मतपत्रिकांवर नजर ठेवली होती. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ७०० ते ८०० पोस्टल मतांचा गठ्ठा पोस्ट कार्यालयामध्ये आढळून आला. लष्करातील जवानांसाठी पिवळ्या रंगाच्या पोस्टल पत्रिका असतात. तशाच याही पत्रिका आहेत.
लष्करातील जवान जम्मूकाश्मीर वा देशाच्या कोणत्याही भागात कर्तव्य बजावत असेल तर तेथील पोस्टाचा शिक्का त्यावर असणे अपेक्षित आहे. मात्र आढळलेल्या मतपत्रिकांवर स्थानिक पोस्टाचाच शिक्का असल्याने त्या बोगस असाव्यात या आमच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. यापूर्वीही असे प्रकार हसन मुश्रीफ यांच्याकडून होत होते. आणि हाही प्रकार त्यांच्याकडूनच झाला असावा असा आरोप करुन प्राप्त झालेल्या पोस्टल मतपत्रिका या केवळ वैध-अवैध असे ठरविण्यापुरते मर्यादित न राहता त्याची सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.