एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये निवडणूक चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही गटांतील हा वाद आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे विकासकामांच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सत्तार आणि शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यातील कथित वादावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>> ‘धनुष्यबाण’ गोठवण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याच्या आरोपांवरुन शिंदे गटाला सवाल; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

अब्दुल सत्तार हे विकृत आहेत. ते कोठेही गेले तरी असेच वागणार आहेत, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे अधिक वृत्त दिले आहे. शिवसेना नावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी मोठा झाला. शिवसेनेचे बोट धरून हे मोठे झाले आहेत. हे शिवसेना फोडण्यासाठी मागच्या तीन वर्षांपासून प्रयत्न करतायत. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

हेही वाचा>>> अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उतरण्याची शिंदे गटाची तयारी, अरविंद सावंत म्हणाले “भाजपाने आग…”

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पर्यायी चिन्हं दिली आहेत. मात्र अजूनही या दोन्ही गटांमधील वाद मिटण्याची शक्यता नाही. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे, उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ ही पर्यायी चिन्हं दिली आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेदेखील यामधील त्रिशूळ आणि उगवता सूर्य या दोन चिन्हांसह गदा या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह द्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याच कारणामुळे दोन्ही गटांना कोणकोणते चिन्ह मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve criticizes abdul sattar on clash with eknath shinde secretary prd
First published on: 10-10-2022 at 16:36 IST