Raigad Guardian Minister Politics : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खरं तर जेव्हा पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले होते, तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या अदिती तटकरे यांना आणि नाशिकचं पालकमंत्री पद भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं होतं. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप देखील सुटलेला नाही. अशातच नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा चर्चा होत्या. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं बोललं जातं. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले हे आग्रही आहेत, त्यांनी याबाबत अनेकदा इच्छाही बोलून दाखवली. मात्र, भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी भरत गोगवले यांना भेटण्यासाठी बोलावून घेतलं असेल तर दुसरं काय? रायगडचं पालकमंत्रिपद. पण भरत गोगवले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळेल असं मला वाटत नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपावाले आता मोजत नाहीत. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून, आर्थिक अधिकारावरून हे दिसून येतं. सध्या शिवसेना (शिंदे)च्या सर्व खात्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. उद्योग विभागाच्या मंत्र्यांना फक्त हात चोळत बसावं लागतं. त्यांचा एमडी त्यांचं ऐकत देखील नाही. एसटी विभागाचंही तसंच झालं आहे. अनेक खात्यांचं असंच झालंय. त्यामुळे एकनाथ शिंदे काहीही करू शकणार नाहीत”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाहांच्या भेटीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का?

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अमित शाह यांच्या भेटीत काही चर्चा झाली का? याविषयी सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं की, या भेटीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, पुढे बोलताना त्यांनी सूचक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, “देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठं काय चाललंय? हे माहिती असतं. अनेक व्यक्तिमत्वाबाबतची माहिती त्यांच्याकडे असते. शेवटी ते मोठे नेते आहेत”, असं ते म्हणाले होते.