मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी हे टोलनाके बंद करण्याची मागणी केली आहे. तर, लबाड लांडगा ढोंग करत असल्याची टीका शेलार यांनी केली होती. याला आता विधानपरिषदत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग राज्य सरकारने महापालिकेला हस्तांतरीत केले आहेत. पालिका त्यांची डागडुजी आणि देखभाल करीत आहे. या मार्गावरील टोल आणि जाहिरातींचा महसूल रस्ते विकास महामंडळ जमा करीत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मालमत्ता कर व पथकर असा दुहेरी भुर्दंड पडत असल्याने टोला नाके बंद करा,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.

हेही वाचा : “…हा अहंकार बरोबर नाही”, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये जुंपली

“…तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नाहीत, पालिकेला कर देणे बंद करा”

यावर आशिष शेलार ट्वीट करत म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत ‘रस्त्यावर खड्डे पडले’, ‘मुंबईची तुंबई झाली’, ‘अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले’, ‘२६ जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली’, ‘झाड पडून काहीजण गेले’, ‘संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले’, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा…!”

“आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो! म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!!”, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला होता.

“शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही अन्…”

याला अंबादास दानवे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी म्हटलं, “काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही.”

हेही वाचा : “महाराष्ट्रात दंगली पेटाव्यात आणि त्यातून…”, ठाकरे गटाचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “देशाची सूत्रे गुजरातच्या…”

“मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत, त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही,” अशा शब्दांत अंबादास दानवेंनी शेलारांना खडसावलं आहे.