राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत, यावरून ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक? राजकीय चर्चांना उधाण

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर, दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे पुण्यात होते. या दरम्यान या दोन नेत्यांमध्ये भेट झाली असून यामध्ये जयंत पाटीलही उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका बड्या व्यावसियाकाच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. यावर अंबादास दानवे म्हणाले की, “या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे. या भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पवारांनी सुस्पष्टपणे सांगितलं आहे की भाजपासोबत जाणार नाही. परंतु, तरीही कार्यकर्ते आणि जनतेमधील संभ्रम लवकरात लवकर दूर व्हावा.” एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अंबादास दानवे बोलत होते.

दरम्यान, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह काही आमदारांनी शरद पवार यांची सलग दोन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं.