सावंतवाडी : महाराष्ट्राचे ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबे आतापासूनच किंचित प्रवाहित होऊ लागले आहेत. यामुळे लवकरच पर्यटन हंगाम सुरू होण्याची चिन्हे असून, स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या साऱ्याची भिस्त पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे.
आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तिन्ही गावे त्यांच्या नयनरम्य निसर्ग सौंदर्यासाठी, घनदाट धुक्यासाठी, फेसाळणाऱ्या धबधब्यांसाठी आणि विपुल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. थंड हवेच्या या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.
पर्यटकांचे आकर्षण केंद्रे:
आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबे, नांगरतास धबधबा,हिरण्यकेशी नदीचा उगम आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ, महादेव गड पॉईंट, वनबाग, फुलपाखरू उद्यान यांसारखी विविध पर्यटन स्थळे पर्यटकांना खुणावत आहेत. याव्यतिरिक्त गेळे येथील कावळेसाद पॉईंट आणि चौकुळमधील विविध पर्यटन स्थळे देखील पर्यटकांना आकर्षित करतात. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे.
पर्यटन वाढीसाठी वन विभागाचा पुढाकार:
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने वन विभागाने पर्यटकांना पर्यटन स्थळांची सैर घडवण्यासाठी दोन वाहने सज्ज ठेवली आहेत. ही वाहने वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देण्यात आली आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आंबोली परिसरातील निसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल. हवामान खात्याने लवकरच मान्सून दाखल होण्याची माहिती दिली असल्याने, आंबोलीतील धबधबे लवकरच पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतील अशी आशा आहे.
सध्याही आंबोलीमध्ये दाट धुके आणि पावसाचा अनुभव घेता येत असून, घाटात धुक्याची चादर पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आंबोली घाट आणि घाटातील नागमोडी वळणे पादाक्रांत करताना अनोळखी पर्यटक बेधुंद होऊन जातात. शाळांना सुट्टी लागली आहे तसेच आज रविवार असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती.