Amit Satam: भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे. अमित साटम म्हणाले, “१९९७ ते २०२२ या कालावधीत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारी प्रशासन लाभलं आहे. देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेत झाला आहे. ३ लाख कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार घडला आहे तर ते मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही जे मांडत आलो आहे त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर काहीही फरक पडलेला नाही असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे सातत्याने भ्रष्टाचारच करत राहिले-अमित साटम
अमित साटम पुढे म्हणाले, मागची २५ वर्षे ते सतत भ्रष्टाचारच करत राहिले. मुंबईचा कोपरा न कोपरा विकून खाल्ला. मुंबईचा सत्यानाश कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुंबईकरांना आता भाजपाकडून अपेक्षा आहेत. मुंबई महानगर पालिका हा शब्द आला की त्यात नकारात्मकताच येते. मुंबई महापालिका म्हटलं की भ्रष्टाचार हेच समोर येतं याचं कारण उद्धव ठाकरे आहेत. भ्रष्टाचाराची प्रतिमा ही त्यांच्यामुळेच निर्माण झाली आहे, असंही अमित साटम म्हणाले. अमित साटम यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला आहे-अमित साटम
बाण हा उद्धव ठाकरेंकडून निघून गेला आहे आणि त्यांच्याकडे खान उरला आहे. उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन ते चार वर्षांत फक्त लांगूलचालनाचं राजकारण केलं आहे. पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या सभांमध्ये फडकतात, बॉम्बस्फोटातले आरोपीचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते करतात. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा असायच्या आणि आता काय आहेत ते मुंबईकरच नाही संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व यांनी कसं सोडलं? हिरव्या रंगाची चादर त्यांनी अंगावर ओढली आहे. आता उद्धव ठाकरेंना एक नवा पॅटर्न आणायचा आहे. जगातल्या पश्चिमी देशांमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी झाली आहे, ज्याप्रकारे रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्टनी ताबा घेतला आहे. अशा प्रयत्नांना बळकट करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. आरोप करण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे आता राहिलंय काय? शिवाय रोज काहीतरी बडबडणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला उद्धव ठाकरेंचा जो विदूषक आहे तो ही असंच काहीतरी बरळत असतो असंही अमित साटम म्हणाले. मराठी माणसांचा आणि मुंबईकरांचा देवाभाऊंवर विश्वास आहे. कारण मागील ११ वर्षात जो काही विकास झाला आहे तो मुंबईकरांनी पाहिला आहे असंही अमित साटम म्हणाले.
शिवसेना खरी कुणाची याचं उत्तर जनतेनेच दिलं आहे-अमित साटम
शिवसेना खरी कुणाची याचं उत्तर वारंवार जनतेने दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेतले ४४ आमदार बाजूला होतात आणि सत्तेला लाथ मारतात त्यावेळीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणाची? हे त्याचवेळी सिद्ध झालं. कोर्टाने, निवडणूक आयोगाने सिद्ध केलं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेला ५७ जागा मिळाला आहे उबाठा गटाला २० जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेना खरी कुणाची हे महाराष्ट्राच्या जनतेने एक प्रकारे सिद्धच केलं आहे. आमच्यासाठी हा प्रश्न आता संपला आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकच शिवसेना आहे. ज्याचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.