सांगली : विटा नगरपालिकेच्या मालमत्ता करात दुप्पटीने करण्यात आलेली वाढ रद्द करण्यात आली असून याबाबतचा नगरविकास विभागाचा अध्यादेश पुढील आठवड्यात  प्रशासनाला  प्राप्त होईल अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.विटा नगरपालिकेने स्थापत्य सोल्यूशन कंपनीला शहरातील मालमत्ता सर्व्हेक्षण आणि करआकारणी करण्याचा ठेका दिला होता.

कंपनीने सर्व्हे करत असताना मालमत्तांची पाहणी न करता मनमानी पध्दतीने करआकारणी केली असून मिळकत धारकांना  १००  ते २०० टक्के अधिक करआकारणी झाली असल्याचे नगरपालिकेकडून मिळालेल्या देयकावरून स्पष्ट झाले. याबाबत आमदार सुहास बाबर यांना माहिती मिळताच त्यांनी नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून वाढीव मिळकत कर आकारणी मागे घेण्याची विनंती केली. यामुळे नगरविकास विभागाने कर आकारणी स्थगित करण्याचे तोंडी आदेश तात्काळ नगरपालिका प्रशासनाला  दिले आहेत. याबाबतचा लेखी आदेश पुढील आठवड्यात प्राप्त होणार असून नागरिकांनी वाढीव कर आकारणीचा भरणा करू नये असे आवाहन श्री. बाबर यांनी केले आहे.

दरम्यान, ठेका घेत असताना  संबंधित ठेकेदार कंपनीने १० टक्के वाढीव  कर आकारणी होईल असे सांगितले असताना अवाजवी आकारणी केली आहे. यामुळे या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही श्री. बाबर यांनी केली आहे.दरम्यान, दि. १० ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विदट्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे शोभा ग्रामीण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे आयोजन करण्यामागे महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी हा हेतू आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गट विविध वस्तू, पदार्थ उत्पादित करतात. मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने मागणी अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. दिवाळी सणाच्या निमित्ताने घरगुती पदार्थ उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळावेत या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यांचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.