कराड : केंद्रीय गृह मंत्रालयाने झारखंडमधील १४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृह मंत्रालय कार्यक्षमता पदक प्रदान केले आहे. या सन्मानातील सर्वांत महत्त्वपूर्ण कामगिरी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अमोल वेणुकांत होमकर यांनी बजावली असून, ते कराडचे सुपुत्र आहेत.झारखंड राज्यात अमोल होमकर यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध अनेक यशस्वी कारवायांचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत भारतीय पोलीस सेवेतील मायकल राज, इंद्रजीत मेहता, सुरेंद्र कुमार झा आणि मनोज स्वर्गीयरी यांच्यासह १४ पोलीस अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे.

दरवर्षी ३१ ऑक्टोबरला लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, गृह मंत्रालय विशेष ऑपरेशन्स, तपास किंवा फॉरेन्सिक कामात असाधारण कार्यक्षमता दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक देवून सन्मानित करते. यावेळी, झारखंड पोलिसांना हा बहुमान मिळाला आहे.जानेवारी २०२५ मध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू झालेली ही कारवाई झारखंडच्या नक्षली इतिहासात महत्त्वाची ठरली आहे. एप्रिल २०२५ मध्ये, पोलिसांनी बोकारो आणि गिरिडीहच्या सीमावर्ती भागात आठ कट्टर नक्षलवाद्यांना ठार मारले, ज्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या विवेक नावाच्या नक्षलवाद्याचाही समावेश होता.

एप्रिल २०२५ मध्ये, झारखंड राज्यात एकाच वेळी आठ नक्षलवादी मारले गेले. पोलीस महानिरीक्षक अनुराग गुप्ता, अमोल होमकर, साकेत सिंग आणि बोकारो रेंज यांच्या पथकाने विवेक उर्फ प्रयाग मांझीच्या पथकावर हल्ल्याची योजना बनवली. अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांची इतंभूत माहिती मिळवली. त्यानंतर, २० एप्रिलला रात्री उशिरा अनुराग गुप्ता, अमोल होमकर आणि साकेत सिंग यांनी संयुक्त संवाद प्रणालीद्वारे (कॉन्फरन्स कॉल) विवेकविरुद्ध कारवाईची योजना आखली.

कोब्रा बटालियन, सीआरपीएफ, झारखंड जग्वार आणि स्थानिक पोलिसांमधील निवडक अधिकाऱ्यांना नियोजनेत समाविष्ट करण्यात आले. सैनिकांनी झुमरा ते लुगु हिलपर्यंतच्या प्रत्येक भागाला वेढा घातला. २० एप्रिलच्या संध्याकाळपासून २१ एप्रिलच्या पहाटेपर्यंत, जंगलातील नक्षलवाद्यांविरुद्ध सतर्क राहिले. २१ एप्रिलला पहाटे पाचच्या सुमारास लुगु टेकडीच्या खाली नक्षलवादी हालचाली दिसल्या. पोलीस व सुरक्षा दल नक्षलवाद्यांच्या जवळ येताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. तासाभराच्या चकमकीनंतर, नक्षलवाद्यांचा गोळीबार थांबला. आणि नक्षलवाद्यांचे आठ मृतदेह सापडले होते. या कारवाईच्या यशस्वीतेबद्दल अमोल होमकर आणि त्यांच्या पथकाचे केंद्र व राज्य सरकारने विशेष अभिनंदन केले होते. याच कामगिरीबद्दल आता केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा १४ जणांना पदकाने सन्मानित केले आहे.