अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. विकासकामांचं उद्घाटन ते करणार आहेत. यामध्ये मला काही आव्हान म्हणून पाहण्यापेक्षा विकासकामं होत आहेत हे चांगलं आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दौऱ्यानंतर काय सूचना दिल्या आहेत त्याबाबत भाष्य करता येईल. माझी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर ज्या मागण्या केल्या गेल्या होत्या त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.

कांद्याची निर्यातबंदी जी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला तर बरं होईल. शक्तीप्रदर्शन करणं किंवा अशा प्रकारे या गोष्टी करणं प्रत्येक पक्षाला, प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार असताना मी त्यावर आक्षेप का घेऊ? असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात मी सक्रिय झालो असं नाही म्हणता येणार कारण मी सक्रिय होतोच. कोव्हिडच्या काळातही मी अनेक कामांचा पाठपुरावा केला. २०२४ ला उमेदवार कोण असणार हा प्रश्न येत नाही. मी विद्यमान खासदार आहे असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ही संधी मला शरद पवार यांनी दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. तसंच पुन्हा शिरुर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी आपल्यालाच मिळेल असाही विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला.