महात्मा गांधी, महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती शहरात केलेल्या एका भाषणात भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटू लागले आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. त्यापाठोपाठ विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. याप्रकरणी सभागृहात चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत आतापर्यंत संभाजी भिडे यांना अटक का झाली नाही, असा प्रश्न काँग्रेस आमदारांनी उपस्थित केला.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत निवेदन देत असताना देवेंद्र फडणवीस हे सातत्याने संभाजी भिडे यांचा ‘गुरुजी’ असा उल्लेख करत होते. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधी बाकावरील आमदार फडणवीसांना म्हणाले, तुम्ही त्यांना गुरुजी का म्हणता? त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही लगेच उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, कारण, आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा ‘गुरुजी’ असा केलेला उल्लेख त्यांच्या मित्रपक्षांनाही आवडलेला नाही. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मिटकरी यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी आमदार मिटकरी म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांचं वरच्या सभागृहात (विधान परिषदेत) भाषण ऐकलं. मी त्यावर हरकतही घेतली.अशा नीच प्रवृत्तीचा माणूस कोणाचा गुरू असू शकेल असं मला वाटत नाही. त्याला कोणी गुरू मानू नये.

हे ही वाचा >> “देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना गुरुजी म्हणत असतील तर…”, उद्धव ठाकरेंचा टोला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, खालच्या सभागृहात (विधानसभेत) देवेंद्र फडणवीस यांनी तसं भाष्य केलं असेल तर मी ते ऐकलं नाही. ते वरच्या सभागृहात जे बोलले, मी तेवढंच ऐकलं. ते म्हणाले, संभाजी भिडे हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. परंतु, हिंदुत्व हे कुठल्याही जातीविरुद्ध प्रचार करा असं सांगत नाही. हिंदुत्व महापुरुषांवर खालच्या पातळीवर टीका करायला सांगत नाही. त्यांनी (संभाजी भिडे) काही पुस्तकांचे दाखले दिले. आम्ही पण अशा काही पुस्तकांचे दाखले देऊ शकतो. मात्र, मर्यादा असल्याने आम्ही ते देऊ शकत नाही. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना गुरू मानलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अशा लोकांना गुरू मानणं हा गुरुपदाचा आणि गुरू परंपरेचा अपमान आहे.