कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज: एक स्मृतिबंध’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार २४ मे रोजी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांनी आपले वडील मराठीचे ख्यातनाम प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे ठेवलेल्या रकमेतून प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार कादंबरी, कथा, ललित आणि आत्मचरित्र यांपैकी कोणत्याही वाङ्मय प्रकारातील त्या वर्षीच्या उत्कृष्ट पुस्तकास हा पुरस्कार देण्यात येतो.

या पुस्तकातून अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रकार असलेले अमोल पालेकर यांचा कलाप्रवास उलगडला असून, एका संवेदनशील कलावंताच्या वैचारिक भूमिकेचे दर्शन प्रवाहीपणे घडते. किशोर बेडकिहाळ, डॉ. विजय चोरमारे यांच्या समितीने ही निवड केली असल्याचे सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी सांगितले.