Ajit Pawar on Rain Update: मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरातील पावसाच्या स्थितीचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. तसेच जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरू जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केली आहे. मिठी नदीची पाण्याची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या नागरिकांना कसे सुरक्षित नेता येईल, याबाबतचे नियोजन सुरू आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि लगतच्या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. १२ वाजता हवामान खात्याचा नवा अहवाल येईल. एकंदरीत राज्यभरात भरपूर पाऊस होत आहे. राज्यात १० लाख एकर क्षेत्र पाण्याखाली आले आहे, तिथली पिके पाण्याखाली आली आहेत. दोन दिवसांत पंचनामे सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, “अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. सातारा, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिथेही अलर्ट देण्यात आला आहे.”
कॅबिनेट बैठक होणारच
अजित पवार पुढे म्हणाले, आज ११ वाजता मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली आहे आणि १२ वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. या दोन बैठका रद्द केलेल्या नाहीत. बहुतेक प्रशासकीय अधिकारी हे मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात राहतात. त्यामुळे त्यांना कार्यालयात येणे शक्य आहे.
राज्यातील धरणे ओव्हरफ्लो
राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. धरणे पूर्ण भरल्यानंतर पूरनियंत्रण करण्याकरिता धरणाचे पाणी कशाप्रकारे सोडले जावे, याचे गृहितक ठरले आहे. धरणारे पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी २४ तास ठेवण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे.