Amravati Violence : “ अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता, त्यामुळे विरोधी पक्षांनी… ” ; यशोमती ठाकूर यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर!

जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत ; फडणवीसांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

त्रिपुरातील हिंसाचारानंतर राज्यात विविध शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. यामध्ये अमरावतीमध्ये निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याने, अमरावतीमधील वातावरण बिघडले होते. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का? या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली. तसेच, यावेळी त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे दिसून आले. यावर आता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे. १२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.” असं यशोमती ठाकूर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ॲड यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सूज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

“ अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला या प्रसंगी शांतता हवीय हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवीय. आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत, मात्र त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचं वातावरण बिघडवायचं आहे असं दिसतंय. अमरावतीत १२ आणि १३ तारखेला घडलेल्या दोन्ही घटना तितक्याच दुर्दैवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामिल असलेल्यांवर कारवाई सुरू आहे, इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा ही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे. ” असं यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे.

“ आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचं स्वागत केले आहे, पण अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचं आवाहन केलं असतं तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी या घटनेचं राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पत्रकारपरिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे हे मान्य केलंय, मात्र याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफी ही त्यांनी मागीतली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केलीय.
१२ तारीख आणि १३ तारखेच्या दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेलीय. कोणालाच सोडणार नाही ही सरकारची भूमिका आहे. ” असं म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत आहेत अशी टीका ही त्यांनी केली आहे.

“ रझा अकादमी चे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गृहविभाग कारवाई करत आहे, त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसंच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात ही चर्चा केली जाईल. ” अशी माहिती ही यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

“दंगल घडवायची होती म्हणून..”; अमरावतीमधील हिंसाचाराबाबत देवेंद्र फडणवीसांची चौकशीची मागणी

याचबरोबर, “ज्यांनी ज्यांनी अफवा पसरवण्याचं काम केलं आहे, त्यांच्यावर कारवाई नक्कीच होत आहे आणि होईल. अमरावतीबाबत माझी सगळ्यांना विनंती आहे विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांना कारण त्या दिवशी मी त्यांना देखील फोन लावलेला होता. त्यांच्या पक्षातील काही लोक खूप विस्फोटक भाषणं करत होती. मी त्यांना देखील फोन लावला गडकरींना फोन लावला. मला माझं शहर, गाव, जिल्हा शांत करायचा होता आणि ते शांत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यांनी देखील शांतता ठेवावी. १२ आणि १३ तारखेला ज्या घटना घडल्या या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्या सगळ्या लोकांवर कारवाई करणं सुरू आहे.” अशी देखील माहिती यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

काय म्हणाले होते फडणवीस? –

“अमरावीतमध्ये १३ तारखेला जी घटना घडली ती १२ तारखेच्या घटनेची प्रतिक्रिया होती. १३ तारखेला झालेल्या हिंसेचे मी समर्थन करणार नाही. पण आता सरकार, अधिकारी आणि अमरावतीचे पालकमंत्री सगळे १३ तारेखेची घटना पुढे आणण्याचे चित्र तयार करत आहेत ते चुकीचे आहे. १२ तारखेची घटना घडली नसती तर दुसऱ्या दिवशीची घटना घडली नसती. त्यामुळे आता सगळी कारवाई १३ तारखेच्या घटनेवर चालली आहे. आम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माला लक्ष करणे आम्हाला मान्य नाही पण त्याचवेळी चुकीच्या घटनेकरता लांगुनचालन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही,” असे देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amravati violence possibility of deteriorating environment due to incomplete information yashomati thakurs reply to fadnavis msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या