‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन’ असा डायलॉग मारला होता. फडणवीसांचा हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस यांनीही हाच डायलॉग एका कार्यक्रमात उच्चारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीस मंगळवारी अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. याठिकाणी जनसेवा फाउंडेशन लोणी व पंचायत समिती (राहाता) यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा शुभारंग केला जाणार होता. तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित राहणार होत्या. पण या कार्यक्रमाला यायला अमृता फडणवीस यांना काहीसा उशीर झाला. त्यामुळे त्यांनी दिलगीरी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांच्या स्टाइलने ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा डायलॉग उच्चारला आहे.

हेही वाचा- “आव्हाडांनी धक्का दिलाय की नाही, हे…”; विनयभंगप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमृता फडणवीस म्हणाल्या, “भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. ‘मेक इन इंडिया’ बनवणं हेही मोदींचं स्वप्न आहे. पण त्यांचं स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा प्रत्येक स्त्री यामध्ये योगदान देईल. आपण सगळे मिळून भारतासाठी हे स्वप्न साकार करू, हे मला ठाऊक आहे. जेव्हा तुमचं कुटुंब सुखी, समाधानी राहील, तेव्हाच हे स्वप्न साकार होईल.”

हेही वाचा- “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य

आपल्या भाषणाचा शेवट करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला या कार्यक्रमात पुन्हा यायचं आहे. मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… कारण यावेळी मला फार मजा आली नाही. कारण येथे यायला मला खूप उशीर झाला. बरीच कामं होती. आता मी जातेय पण मी पुन्हा येईन…”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis ahmednagar visit dialogue mi punha yein in devendra fadnavis style rmm
First published on: 15-11-2022 at 20:33 IST