मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आज ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान’ शुभारंभ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून अमृता फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं.
या कार्यक्रमातून अमृता फडणवीस यांनी कॅन्सरमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक केलं. कॅन्सर आजाराबाबत प्रबोधन आणि वेळेवर तपासणी होणं आवश्यक असल्याचंही अमृता फडणवीसांनी सांगितलं. ‘ना बिमार होऊंगा, ना होने दूंगा’ असा मंत्र आत्मसात करण्याची सूचनाही अमृता फडणवीसांनी दिली.
अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या की, या कार्यक्रमात येऊन मला खूप छान वाटलं. दुसऱ्या टप्प्यात आपण आपल्या शक्तीसाठी आणि आरोग्यासाठी लढणार आहोत. जसं मोदीजी म्हणतात, ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, त्याप्रमाणे बावनकुळेंमुळे आपल्याला कळलं की, ‘ना सोऊंगा ना सोने दूंगा’ आता आपल्याला ‘ना बिमार होऊंगा, ना बिमार होने दूंगा’ हा मंत्र आत्मसात करायचा आहे. ही प्रबोधनाची गोष्ट आहे. कॅन्सरबाबतचं प्रबोधन आणि वेळेवर तपासणी होणं खूप गरजेचं आहे. हे काम आपल्याद्वारे होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. आपण सर्वजण मिळून महाराष्ट्र सुंदर आणि सुदृढ बनवू.